Hemant Godse: नाशिक: लोकसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने अखेर महिन्याभराच्या प्रदीर्घ चर्चेनंतर महायुतीचा उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांच्या नावाची आज (1 मे) घोषणा केली.
ADVERTISEMENT
अखेर अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा कोणाला मिळणार याबाबत सस्पेन्स कायम होता.
राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकची जागा मिळावी यासाठी बराच जोर लावला होता. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ हेच निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चाही सुरू होती. तर दुसरीकडे ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी हेमंत गोडसे यांनी शेवटपर्यंत मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणं लावून धरलं. अखेर आज याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला.
हे ही वाचा>> शिंदेंचे लोकसभेचे 15 उमेदवार ठरले! कोणत्या जागा गमावल्या? पहा संपूर्ण यादी
लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाल्यापासूनच नाशिकच्या जागेबाबत महायुतीत वाद सुरू झाला होता. ही जागा आपल्यालाच मिळावी असा महायुतीतील तीनही पक्षाने दावा केला होता. अखेर याबाबत दिल्लीत चर्चा झाल्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. ज्यामुळे सलग तिसऱ्यांदा हेमंत गोडसे यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे.
हेमंत गोडसेंनी पुन्हा दिला छगन भुजबळांना शह
हेमंत गोडसे यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि 2019 निवडणुकीत समीर भुजबळ यांच्यावर मात केली होती. पण याच जागेसाठी हेमंत गोडसेंच्या पत्ता कापून छगन भुजबळ हे निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत होते. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी ही जागा शिंदेंच्या वाटेला आल्याने भुजबळांना मोठा शह मिळाला आहे.
हेमंत गोडसेंनी रचलाय इतिहास...
एकदा निवडून दिलेला खासदार नाशिक जिल्हा पुन्हा निवडून देत नाही. हा 42 वर्षांचा इतिहास खोडून काढला तो शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी. 2014 आणि 2019 मध्ये सलग दोनदा खासदार म्हणून निवडून येण्याची किमया केली.
हे ही वाचा>> Lok Sabha Election 2024: शिवसेनेने (शिंदे गट) नाशिकची जागा गमावली?, गोडसेंचं करिअर पणाला..
2014 च्या निवडणुकीत छगन भुजबळांसारख्या तालेवार नेत्याचा हेमंत गोडसेंनी दणदणीत पराभव केला होता. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी 2019 मध्ये भुजबळ काका-पुतण्यानी नाशिक लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, शिवसेना आणि भाजपने 2014 ते 2019 या पाच वर्षांत मतदारसंघात जोमाने प्रचार करत आपली ताकद निर्माण केलेली.
एकीकडे गोडसे आणि भुजबळ हे आमनेसामने उभे ठाकलेले असताना दुसरीकडे कोकाटे आणि पवार यांच्या उमेदवारीमुळे मात्र निवडणुकीचं चित्रच बदलेलं. त्यातही माणिकराव कोकाटे यांच्या बंडखोरीमुळे सर्वाधिक फटका हा समीर भुजबळ यांना बसला होता. कारण, त्यांच्याच उमेदवारीमुळे झालेल्या मतविभाजनाचा थेट फायदा हा हेमंत गोडसेंना झाला होता.
सन 2009 मध्ये या मतदारसंघात तिरंगी लढत होऊन त्याचा फायदा थेट ‘राष्ट्रवादी’चे समीर भुजबळ झालेला. त्यावेळी ते 22 हजार मतांनी निवडून आलेले. पण 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसेंनी भुजबळांना आस्मान दाखवत दणदणीत विजय मिळवला होता.
यामुळे आता हेमंत गोडसे सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत यशस्वी ठरणार का? याकडे सर्व नाशिककरांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT