Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंनी गमावल्या 2 जागा, आणखी किती मतदारसंघांवर सोडावं लागणार पाणी?

रोहित गोळे

22 Mar 2024 (अपडेटेड: 22 Mar 2024, 11:09 PM)

Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंना अमरावती आणि कोल्हापूर या जागा काँग्रसेला द्याव्या लागल्या आहेत. मात्र, याशिवाय आणखी कोणते मतदारसंघ हे त्यांना सोडावे लागणार आहेत याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंना आणखी किती जागा सोडाव्या लागणार?

उद्धव ठाकरेंना आणखी किती जागा सोडाव्या लागणार?

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंनी काँग्रेससाठी सोडल्या दोन जागा

point

उद्धव ठाकरेंना आणखी किती जागा सोडाव्या लागणार?

point

महाविकास आघाडीचं अजूनही जागा वाटप पूर्ण नाही

Lok Sabha Election 2024 Shiv Sena UBT Seats: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 चं मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. असं असताना अद्यापही महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्या जागांचं वाटप काही पूर्ण झालेलं नाही. दोन्हीकडे अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेसने महाराष्ट्रासाठी आपल्या काही उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. काँग्रेसने कालच (21 मार्च) महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावं जाहीर केली. ज्यामध्ये हे स्पष्ट झालं की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आघाडीमध्ये 2 जागा या गमवाव्या लागल्या आहेत. याशिवाय आणखी किती जागांवर त्यांना पाणी सोडावं लागणार हेच आपण आता जाणून घेऊया. (lok sabha election 2024 uddhav thackeray already leave 2 seats for congress now shiv sena ubt how many more constituencies will have to release in mva)
 
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला (UBT) सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं सध्या बोललं जातंय. पण असं असलं तरी त्यांना काही जागा सोडाव्या लागू शकतात अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यापैकी दोन जागा या ठाकरेंनी गमवल्या आहेतच.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Shivsena UBT महाराष्ट्रात जिंकणार 'या' जागा, पाहा यादी

काँग्रेसने महाराष्ट्रातील जी पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये त्यांनी कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती आणि अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने लढवल्या होत्या. ज्यापैकी अमरावतीतून आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला होता. तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवली होती आणि तिथे विजयही मिळवला होता. 

पण 2022 च्या शिवसेनेतील फुटीनंतर आनंदराव अडसूळ आणि संजय मंडलिक हे दोन्ही नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेले. 

मात्र, महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा विचार केला तर या दोन्ही जागा या ठाकरेंच्या वाटेच्या होत्या. मात्र, तरीही ठाकरेंनी त्या दोन्ही जागा या काँग्रेसला दिल्या आहेत. मात्र, या मोबदल्यात त्यांनी कोणत्या जागा घेतल्या आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

उद्धव ठाकरेंना आणखी 7 जागांवर सोडावं लागणार पाणी?

दुसरीकडे अशीही जोरदार चर्चा आहे की, अमरावती आणि कोल्हापूरसह उद्धव ठाकरेंच्या आणखी 7 जागांवर काँग्रेस किंवा मित्र पक्ष दावा करत आहे. त्यामुळे त्या जागांबाबत नेमका काय तोडगा निघालाय याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे ही वाचा>> शिंदे कल्याण गमवणार की राखणार? भाजपची एक खेळी अन्..

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सात असे मतदारसंघ आहेत की, ज्या शिवसेनेच्या आहेत. मात्र, त्यापैकी काही खासदार हे ठाकरेंसोबत नाहीत. त्यामुळेच त्या जागांवर काँग्रेसने दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्या नेमक्या कोणत्या जागा आणि त्यावर कोणाचा दावा हे आपण पाहूया.

  1. मुंबई दक्षिण मध्य - काँग्रेसचा दावा
  2. सांगली - काँग्रेसचा दावा
  3. पालघर - काँग्रेसचा दावा
  4. हातकणंगले - राजू शेट्टींचा दावा
  5. हिंगोली - काँग्रेसचा दावा
  6. बुलढाणा - काँग्रेसचा दावा
  7. रामटेक - काँग्रेसचा दावा

यामुळे या सातही जागांवर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याची सध्या चर्चा आहे. 

अशावेळी आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या सात जागांपैकी, सांगलीतील जागेवरील उमेदवाराची घोषणा उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतच करून टाकली आहे. त्यामुळे मविआमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. मात्र, जोवर तीनही पक्षांची सर्व उमेदवारांची यादी जाहीर होत नाही तोवर चित्र स्पष्ट होणार नाही.

    follow whatsapp