Lok Sabha Election: साताऱ्यात पावसाचा धुमाकूळ... निवडणूक, सातारा अन् पाऊस; नेमका इतिहास काय?

मुंबई तक

17 Apr 2024 (अपडेटेड: 17 Apr 2024, 08:09 PM)

Satara Rain: साताऱ्यात आज (17 एप्रिल) मुसळधार पावसाने हजेरी लावली. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना साताऱ्यात पावसाने जी हजेरी लावली त्याने मात्र, एक वेगळीच चर्चा साताऱ्यात रंगली आहे.

निवडणूक, सातारा अन् पाऊस!

निवडणूक, सातारा अन् पाऊस!

follow google news

Satara Rain and Lok Sabha Election: सातारा: मागील आठ दिवस रणरणत्या उन्हाने सातारकरांना अक्षरश: होरपळून काढलेलं असताना आज मात्र, अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चारनंतर सातारा शहर ग्रामीण भागात विशेषतः जावळी तालुका, वाई तालुका, सातारा तालुका परिसरावर काळया ढगांची दाटी होऊन अवकाळी पावसाने दमदार बॅटिंग केली. पण याच पावसाने एक वेगळीच चर्चा साताऱ्यात रंगली आहे. (lok sabha election rain and satara satarakar remembered sharad pawar meeting in the rain udayanraje bhosale bjp)

हे वाचलं का?

साताऱ्याच्या पावसातील 'ती' सभा!

पाऊस आणि निवडणूक असं म्हटलं की, प्रत्येकालाच साताऱ्यातील शरद पवारांची ऐतिहासिक सभा आठवते. 2019 च्या विधानसभेसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. 2019 लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर साताऱ्यातून निवडून आले होते. मात्र, चारच महिन्यात त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती. विधानसभेसोबतच पोटनिवडणूक लावण्यात यावी असा आग्रह उदयनराजेंनी भाजप नेत्यांकडे धरला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेसोबतच ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. 

सुरुवातीला या पोटनिवडणुकीत नेमकं कोणाला तिकीट द्यावं यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बराच खल झाला होता. तर दुसरीकडे उदयनराजे पुन्हा बहुमताने निवडून येतील असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक करत होते. 

खरं तर ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. कारण सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मोदी लाटेत दोन्ही लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात आपलं दान टाकलं होतं. असं असताना पोटनिवडणुकीत जर राष्ट्रवादीचा पराभव झाला असता तर ते खुद्द पवारांना परवडणारं नव्हतं. 

अशावेळी स्वत: शरद पवार हे रिंगणात उतरले आणि त्यांनी या पोटनिवडणुकीची सूत्र घेतली. त्यांनी सर्वात आधी त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील या जुन्याजाणत्या नेत्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी देऊ केली. त्यानंतर स्वत: साताऱ्यात प्रचार केला. पण याच निवडणुकीच्या चार दिवस आधी साताऱ्यात पवारांनी जी जाहीर सभा घेतली ती सभा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक अशीच ठरली.

साताऱ्यात संध्याकाळच्या सुमारास शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. पण त्याच सभेत पावसानं जोरदार हजेरी लावली. ज्यावेळी शरद पवार हे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा पाऊस ऐन भरात होता. त्याच मुसळधार पावसात शरद पवार यांनी अत्यंत घणाघाती पण सातरकरांसह महाराष्ट्राच्या जनतेच्या देखील काळजाला हात घालणारं भाषण केलं होतं. पवारांचं हेच भाषण आणि हीच सभा खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली होती. 

केवळ सातारा लोकसभा नव्हे तर महाराष्ट्रातील विधानसभेचं देखील चित्र यामुळे पालटून गेलं. पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. तर महाराष्ट्रात देखील पवारांनी 50 हून अधिक जागा निवडून आणल्या होत्या. तेव्हापासूनच पवारांची साताऱ्यातील पावसातील सभा ही आजही चर्चेचा विषय ठरली आहे. 

साताऱ्यात आज मुसळधार पाऊस.. 

आता पुन्हा एकदा निवडणुकांचं वातावरण हे संपूर्ण देशभर आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान हे दोनच दिवसांनी होणार आहे. असं असताना आज साताऱ्यात मुसळधार पावसाने जी हजेरी लावली त्यामुळे अनेकांनी पवारांच्या सभेच्या आठवणी जागवल्या.

खरं तर सातारा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे तिथे म्हणावा तसा प्रचारही सुरू झालेला नाही. मात्र, निवडणुकीचा जो माहोल आहे त्यातच पावसाने आज जी हजेरी लावली आहे त्याने अनेकांना 2019  च्या सभेची मात्र आठवण झाली आहे.

मात्र 2019 च्या पोटनिवडणुकीनंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. भाजपने लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा तिकीट देऊ केलं आहे. तर दुसरीकडे जायंट किलर ठरलेले श्रीनिवास पाटील हे मात्र यंदा निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यांच्याऐवजी शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना तिकीट दिलं आहे. यामुळे ही लढत नेमकी कशी होणार याकडे सातारकरांसह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. 

  

    follow whatsapp