Madha Lok Sabha Constituency : माढा लोकसभा मतदार संघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण भाजपने या मतदार संघातून इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मोहिते पाटील गट आणि फलटणचा रामराजे निंबाळकर गट चांगलाच आक्रमक झाला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी
रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने निंबाळकर बंधू आणि शेकापच्या जयंत पाटील मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले आहेत. या बैठकीनंतर आता मोहिते पाटील माढा लोकसभेतून काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण अकलूजकरांचे लक्ष लागले आहे. (madha lok sabha constituency mohite patils residence meeting in akluj ranjitsingh nimbalkar bjp akluj solapur)
ADVERTISEMENT
माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे माढ्यातून मोहिते पाटलांना डावलण्यात आल्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोहिते पाटलांनी लोकसभा लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही देखील आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर 'माढा आणि निंबाळकरांना पाडा' अशी मोहिम राबवली जात आहेत.
हे ही वाचा : ठाकरेंना शिंदेंचे दोन झटके! जिल्हाप्रमुखानंतर आमदारही शिंदेंच्या सेनेत
या सर्व घडामोडींवर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर अत्यंत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राजराजे निंबाळकर त्यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर, शेकापचे जेष्ठ नेते व इंडिया आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख भाई जयंत पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शिवरत्नवर दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि महत्वाच्या नेत्यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव मोहिते पाटीलांवर आहे. पण अद्याप मोहिते पाटलांनी कोणतीच भूमिका मांडली नाही. त्यात आजच्या बैठकीनंतर मोहिते पाटील यांनी आज दुपारी 4 च्या सुमारास अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आयोजित केला आहे. त्यामुळे आता मोहिते पाटील माढा लोकसभेतून काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण अकलूजकरांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT