Maha Vikas Aghadi Vanchit Bahujan Aghadi : "त्यांनी सूचवलेल्या जागांपैकी चार जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिला. मात्र, त्यानंतर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. ते आमच्यासोबत असते तर आम्हाला बळ मिळाले असते." शरद पवारांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानाने वंचित आणि मविआतील दुरावा समोर आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी वंचितसाठी चर्चेची दारं खुली ठेवून त्यानुषंगाने जागावाटप निश्चित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीचे जागावाटप वंचित बहुजन आघाडीमुळे रखडले आहे. पण, पहिल्या टप्प्यातील मतदान महिनाभरावर आलेले असून, आता महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीशिवाय पुढे जाण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
वंचितच्या भूमिकेने मविआ नाराज...
प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने वेगवेगळ्या मागण्या आणि भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीची अडचण झाली. त्यात चार जागांचा प्रस्तावही वंचित बहुजन आघाडीने फेटाळून लावला आहे. दुसरीकडे आंबेडकरांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बाजूला सारत काँग्रेसला वेगळा प्रस्ताव दिला. या भूमिकेमुळे मविआत नाराजी आहे. याबद्दल संजय राऊतांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
संजय राऊत काय म्हणाले?
"वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे सन्मानीय नेते आहेत. त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली. त्यांनी महाराष्ट्रात चार जागांवर लढावं, हा प्रस्ताव आम्ही दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता, तर निश्चितच आम्हाला आनंद झाला असता."
हेही वाचा >> शिंदेंच्या सेनेच्या 'या' जागांवर भाजपचा कब्जा!
"हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकर आमच्यात असण्याने गती आणि बळ नक्कीच मिळाले असते. पण, मला अजूनही खात्री आहे की, सगळे नेते एकत्र बसतील. आणि ते पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करतील. त्यांच्या मनात जर काही नाराजी, अस्वस्थता असेल, तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल."
"महाराष्ट्रातील वंचित, दलित शोषित समाज या लढ्यामध्ये आमच्यासोबत असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही चार जागांचा प्रस्ताव वंचितला दिलेला आहे. त्या चार जागा आम्ही जिंकू शकतो."
हेही वाचा >> काँग्रेसचे उमेदवार ठरले! ठाकरेंकडून 'या' जागा गेल्या?
संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेवरून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल महाविकास आघाडी नाराज असल्याचे दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांचे हे रिडल्स इन पॉलिटिक्स प्रकरण आहे, असेही राऊत म्हणालेले. त्यामुळे वंचित आणि मविआमध्ये दुरावा वाढत चालल्याचे दिसत आहे.
आधी जागावाटप आणि नंतर आंबेडकरांसोबत चर्चा
वंचितमुळे जागावाटप रखडले असल्याने आता महाविकास आघाडी वेगळ्या भूमिकेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष जागावाटप निश्चित करणार आहे. त्यानंतर वंचितला ज्या जागा हव्या, त्या पक्षाकडून वंचित बहुजन आघाडीला देण्याबद्दल चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे आता वंचितला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी चर्चा करण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT