BJP Lok Sabha Results 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीने भाजपला जबर झटका बसला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकीत भाजपच्या तीन केंद्रीय तर एका राज्यातील कॅबिनेट मंत्र्याचा दारूण पराभव झाला आहे. (BJP's Four Minister from Maharashtra defeated in lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाबद्दलचे एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेत तब्बल 30 लोकसभा मतदारसंघात गुलाल उधळला. महायुतीला या निवडणुकीत जोरदार झटका बसला असून, चार मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
रावसाहेब दानवे यांचा पराभव, कल्याण काळे ठरले जायंट किलर
तब्बल पाच वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी पराभव केला. एक लाखाहून अधिक मताधिक्य घेत कल्याण काळे यांनी विजयाचा गुलाल उधळला.
रावसाहेब दानवे सहाव्यांदा विजयी होतील का? याची उत्सुकता होती. दानवे हे मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्य मंत्री होते. त्यांचा पराभव करत कल्याण काळे हे जायंट किलर ठरले आहेत.
भारती पवार यांचा दारूण पराभव
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री असलेल्या भारती पवार यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भास्कर भगरे यांनी भारती पवार यांच्या लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेत पराभव केला.
भास्कर भगरे यांना ५ लाख ७७ हजार ३३९ मते मिळाली, तर भारती पवार यांना ४ लाख ६४ हजार १४० मते मिळाली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मालती डोमसे यांनी ३७ हजार १०३ मते घेतली. भारती पवार यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली होती. पण, महायुतीतील नाराजीचा त्यांना फटका बसल्याचे बोलले जात आहे.
कपिल पाटील यांनाही दणका
मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळ्या मामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांनी पराभव केला. मोठे मताधिक्य घेत सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना धोबीपछाड दिला.
सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख मतांनी पराभव
चंद्रपूर चिमूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने पुन्हा एकदा राखला आहे. स्व. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी दणदणीत विजयाची नोंद केली.
प्रतिभा धानोकर यांना तब्बल ७ लाख १८ हजार ४१० मते मिळाली. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना ४ लाख ५८ हजार ४ मते मिळाली आहेत. मुनगंटीवार यांचा प्रतिभा धानोरकर यांनी २ लाख ६० हजार ४०६ मतांनी पराभव केला.
ADVERTISEMENT