Sambahaji Raje Social Media Post : महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या जागेवरून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर आता शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुत्र संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संभाजीराजेंनी कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. (shahu maharaj contest election on kolhapur seat maha vikas aghadi sambhaji raje social media post maharashtra politics)
ADVERTISEMENT
शाहू महाराजांची कोल्हापुरातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आल्याने उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांची भेट घेतली या भेटीवेळी संभाजीराजे अनुपस्थित होते. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीवरुनची नाराजी अद्याप संपलेली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच संभाजी राजांची ही पोस्ट समोर आली आहे. एरव्ही जाहीरपणे बोलताना मोठे महाराज असा संभाजी राजे आपल्या वडीलांचा शाहू महाराजांचा उल्लेख करतात. मात्र या पोस्टची सुरुवातच त्यांनी अभिनंदन बाबा अशी केली आहे.
हे ही वाचा : Devendra : फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, ''25 वर्षात एक प्रोजेक्ट...''
संभाजीराजेंची पोस्ट जशीच्या तशी...
अभिनंदन बाबा...
गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम... पुढे दिलेला शब्द.... आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे.
कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे...
ADVERTISEMENT