Sanjay Mandlik Kolhapur : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलेल्या एका विधानाने वाद उभा राहिला आहे. शाहू महाराजांबद्दल केलेल्या विधानाबद्दल माफी मागा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात असतानाच मंडलिक यांनी आता थेट शाहू महाराज छत्रपतींना आव्हान दिलं आहे. समजून घ्या नेमकं काय म्हणाले?
ADVERTISEMENT
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती अशी लढाई होत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल एक विधान केले.
नेसरी येथे बोलताना मंडलिक म्हणाले होते की, "आताचे शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरचे आहेत का? दत्तक आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत. आम्ही कोल्हापुरची जनताच खरी वारसदार आहे."
संजय मंडलिकांवर विरोधकांची टीका
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलेल्या विधानावर शरद पवार म्हणाले की, "छत्रपती शाहू महाराज हे सेवेचा आदर्श ठेवून काम करत आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करताहेत यावरून विरोधकांची मानसिकता काय आणि ते कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात हे दिसतेय."
"शाहू महाराजांविषयी जनमानसात आदर आहे. राजघराण्यावर दत्तक गोष्टी नव्या नाहीत. दत्तक घेतल्यावर तो घराण्याचा प्रतिनिधी होतो", अशा शब्दांत पवारांनी मंडलिकांचे कान टोचले.
हेही वाचा >> "चारशे पार काय सगळी लोकसभाच घ्या ना"; शिंदेंच्या नेत्याची भाजपवर घणाघाती टीका
मंडलिकांच्या या विधानावर सतेज पाटील म्हणालेले की, "शाहू महाराजांवर कुणीही वैयक्तिक टीका करणार नाही, असे संजय मंडलिक यांनी सांगितले होते. पण, पराभव दिसताच त्यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. त्यांना कोल्हापूरकर जनता निवडणुकीत धडा शिकवेल."
हेही वाचा >> Raj Thackeray यांना पहिला धक्का! मोदींना पाठिंबा देताच 'या' नेत्याने सोडली साथ!
"कोल्हापूरच्या गादीविषयी संजय मंडलिक यांनी काढलेले उद्गार अत्यंत निंदनीय आहेत. त्यांना कोल्हापूरकर उत्तर देतील. मंडलिक यांचे उद्गार भाजपच्या स्ट्रॅटजीचा भाग तर नाही ना?", अशी शंका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली.
संजय मंडलिक म्हणाले, "माफी मागणार नाही"
वाद निर्माण झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. मंडलिकांनी शाहू महाराज छत्रपतींनाच आव्हान दिलं आहे. ते म्हणाले की, "मी खरे वंशज या शब्दाऐवजी थेट असा शब्द प्रयोग करायला हवा होता. छत्रपतींच्या घराण्याचा आदर करतो, पण श्रीमंत शाहू छत्रपती हे थेट वंशज नाहीत. ते दत्तकच आहेत. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही. आधी त्यांनी आपण थेट वंशज आहोत, हे सिद्ध करावे. जर चुकीचं बोललो असेन, तरच माफी मागेन", असं आता मंडलिक म्हणाले आहेत. त्यामुळे या मुद्द्याभोवतीच कोल्हापुरातील प्रचार फिरणार असं दिसतं आहे.
ADVERTISEMENT