Sharad Pawar on Narendra Modi Offer : काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या आणि सन्मानाने स्वप्न पूर्ण करा, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीए सामील होण्याची ऑफर दिली. त्यांच्या या ऑफरवर शरद पवारांनी सविस्तर भूमिका मांडली. तेच या विधानामागील कारणाबद्दलही भाष्य केले.
ADVERTISEMENT
पुण्यात शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मोदींनी दिलेल्या ऑफरवर पवार यांनी सविस्तर भूमिका मांडली.
पवार म्हणाले, "आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींमुळे संकटात आली आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली. याच्या पाठिमागे केंद्रीय नेतृत्वाचा, केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास आहे."
हेही वाचा >> "काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा...", मोदींची पवार-ठाकरेंना 'ऑफर'
"ज्या व्यक्तीचा, ज्या पक्षाचा, ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही, असा समज लोकांचा पक्का झाला असेल, त्यांच्याबरोबर असोसिएशन माझ्याकडून वैयक्तिक सोडा, तर राजकीय हे माझ्याकडून कधीही होणार नाही", अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
मोदींची अलिकडची भाषणं.......
पवार पुढे म्हणाले, "मी हेही म्हटलं की, गांधी-नेहरुंची विचारधारा आमची आहे. गांधी नेहरूंची विचाराधारा ही एखाद्या समाजाच्या विरोधात... मी स्टेटमेंट मी वाचलं. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी (मोदी) मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला."
हेही वाचा >> "दबाव होता... तुरुंगात जाणं किंवा शिवसेना सोडणं, हे दोनच पर्याय होते"
"हा देश एकसंघ ठेवायचा असेल. इथे हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई, जैन सगळ्या घटकांना एकत्र ठेवून आपल्याला हा देश पुढे न्यावा लागेल. एका धर्मीय समाजासंबंधी वेगळी भूमिका मांडायला लागलो, तर समाजात ऐक्य राहणार नाही, गैरविश्वास राहील. मोदींची अलिकडची भाषणं ही समाजा समाजामध्ये गैरविश्वास निर्माण होण्यासाठी पोषक आहेत आणि ते देशासाठी घातक आहे. जे देशाच्या हिताचं नाही, तिथं ते आमचे सहकारी असणार नाहीत", असे शरद पवार म्हणाले.
मोदी अस्वस्थ आहेत -शरद पवार!!!
"जे काही निवडणुकांचे दोन-तीन टप्पे झालेत. त्याच्यामध्ये एकंदर चित्र दिसतंय मतदारांचं... एकंदर स्थिती दिसतेय... निर्णय घेतलेला दिसतात. त्यावरून मोदींचा जो विचार आहे, त्या विचाराविरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांची ही अस्वस्थता अशी विधानं हे सांगतात किंवा संभ्रम तयार करण्याची भूमिका सांगतात", असे शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT