Lok Sabha election : "मोदी देशाचे पंतप्रधान नाही, तर...", शरद पवारांनी डिवचले

मुंबई तक

21 Apr 2024 (अपडेटेड: 21 Apr 2024, 04:06 PM)

Sharad Pawar Vs Narendra Modi : शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वाटतात, असे ते म्हणाले.

शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी.

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवार यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

point

नेहरूंवर केलेल्या टीकेवरून मोदींना सुनावलं

point

शरद पवार काय काय बोलले?

Sharad Pawar Vs Narendra Modi, Lok Sabha election 2024 : (इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे मविआच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी काही मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. (Sharad Pawar comments that Modi is not the India's prime minister, but BJP's prime minister)

हे वाचलं का?

"लोकसभेची निवडणूक आली आहे. या देशाचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? तो कारभार कशा पद्धतीने चालवायचा? देशासमोर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद ही कोणामध्ये आहे, याचा विचार करून निर्णय घ्यायचा", असे पवार यावेळी म्हणाले. 

"अनेक ठिकाणी मी पाहिलं, महाराष्ट्राच्या बाहेरची माहिती घेतली, लोकांना बदल पाहिजे आहे. लोक या आघाडीला पाठिंबा द्यायला मनापासून तयार आहेत आणि त्या आघाडीचे दोन खंदे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि कल्याण काळे आज आपल्या सगळ्यांच्या वतीने या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तुमची माझी जबाबदारी आहे की त्यांना मोठ्या मतांनी विजयी करायचं आणि देशाचं राजकारण योग्य रस्त्यावर न्यायचं", असे आवाहन पवारांनी यावेळी केले. 

मोदींवर पवारांनी काय केली टीका?

पवार या मेळाव्यात बोलताना म्हणाले, "मी इथे यायच्या आधी मोदी साहेबांचे भाषण ऐकत होतो, ते आज मराठवाड्यात आहेत. सबंध भाषणामध्ये त्यांनी सांगितलं काय? हे भाषण असो, याच्या आधीचं भाषण असो, अन्य राज्यातील भाषणं असोत अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा सबंध देशाचा असतो. त्यांची भाषणे ऐकली, त्यांचे विचार समजून घेतले, तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे सबंध देशाचे पंतप्रधान नाहीत, तर भाजपचे पंतप्रधान आहेत", अशी टीका पवारांनी मोदींवर केली.

हेही वाचा >> लोकसभेच्या धामधुमीत ठाकरेंना निवडणूक आयोगाचा मोठा धक्का! 

"देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी राजकीय दृष्टिकोन ठेवावा लागतो. मतभिन्नता असू शकते, पण राजकीय दृष्टिकोन याची राष्ट्रीय गरज असते. आज मोदी कुठेही गेल्यानंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत, राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे याचे विस्मरण त्यांना होते आणि ते सातत्याने कधी नेहरूंवर टीका करतात, कधी राहुल गांधी यांच्यावर टीका करतात, कधी माझ्यावर टीका करतात, कधी आघाडीवर टीका करतात. या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही काय करणार? हे देशाला सांगा", असा सवाल करत पवारांनी मोदींना टीकेचे बाण डागले. 

नेहरूंवर टीका, पवारांनी मोदींवर केला पलटवार

पवार म्हणाले, "जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्यातील १० वर्षांपैकी जास्त वर्ष ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढायला घालवली, तुरुंगामध्ये गेले, स्वतःच्या घरादाराचा विचार केला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे यासाठी प्रयत्न केले, विज्ञानाला प्रोत्साहित केले आणि जगातली महत्त्वाची सत्ता भारत व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. अशा देशासाठी प्रचंड योगदान देणारे जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे नेतृत्व त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे याचा अर्थ आज या देशाचे प्रधानमंत्री यांची मानसिकता काय आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट होते", अशा शब्दात पवारांनी मोदींवर पलटवार केला.

हेही वाचा >> 'महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर...' 

"त्यांनी सांगितलं होतं, माझ्या हातात सत्ता द्या. ५० दिवसांच्या आत मी महागाईचा प्रश्न सोडवतो. महागाईचा प्रश्न सोडवला का? पेट्रोलच्या किंमती कमी केल्या का? आज त्यांनी सांगितलं ५० दिवसांच्या आत मी पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्यांच्या किंमती ५० टक्क्यांनी कमी करीन. नाही करता आली, उलट त्या किंमती वाढल्या", असे म्हणत पवारांनी महागाईच्या मुद्द्यावरून मोदींना घेरलं.

 

"इथे आमच्या आया-बहिणी बसल्या आहेत त्यांना सांगितलं होतं की, गॅसच्या किंमती मी कमी करणार, त्या दुप्पट केल्या. आज संसार चालवणं, हे भगिनींना अवघड झालं आणि त्याचे महत्त्वाचे कारण जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात या पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारने काहीही पाऊले टाकलेली नाहीत. आपल्याला संकटामध्ये टाकण्याचं काम केलं", अशी टीका पवारांनी मोदी सरकारवर केली.

    follow whatsapp