Uddhav Thackeray sangli lok sabha constituency : सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. या जागेचा काँग्रेसकडून अजूनही आग्रह केला जात आहे. पण, ही जागा शिवसेनेकडेच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहणार, असंच दिसत आहे. कारण खुद्द उद्धव ठाकरे यांनीच तशी भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
लोकशाही वाचवा रॅलीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. या वेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबद्दल भूमिका स्पष्ट केली.
महाविकास आघाडीतील समन्वय... उद्धव ठाकरे काय म्हणाले?
महाविकास आघाडीत समन्वय दिसत नाहीये, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ठाकरे म्हणाले, "मग महायुतीमध्ये तरी कुठे दिसतोय."
हेही वाचा >> कंगना रणौत यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर! कोणता फॅक्टर जाणार जड?
महायुतीमध्ये समन्वय नाहीये म्हणून महाविकास आघाडीत समन्वय ठेवायचा नाही का? असा उलट प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे म्हणाले, "माझं काय म्हणणं आहे की, एकतर्फी प्रश्न विचारण्याला काही अर्थ नाहीये. निवडणूक म्हटल्यानंतर... शिवसेना भाजप युतीच्या काळात जागावाटपाआधी हे प्रकार व्हायचे. पण, ज्या पद्धतीने आता महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. नैसर्गिक आघाडी असा गोंडस शब्द आहे. महायुतीला नैसर्गिक म्हणायचं का? हे काय आहे. भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन तुम्ही युती पुढे नेत आहात. भ्रष्टाचार हा तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का? त्यामुळे त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन ते युती करताहेत. महाविकास आघाडीचे उत्तम चाललं आहे."
हेही वाचा >> बारामतीत नणंद विरुद्द भावजय लढत, पण कुणाचं पारड जड?
महाविकास आघाडीत काही जागांवरून पेच आहे? उद्धव ठाकरे म्हणाले, "पेच नाहीये. आमची जेव्हा भाजपसोबत युती होती किंवा असायची त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपामध्ये थोडी खेचाखेच ही व्हायची. मात्र, एकदा शिक्कामोर्तब झाल्यावर सगळे एकजिनसीपणाने काम करायचे. महाविकास आघाडीमध्येही बोलणी दोन-तीन महिने झाल्यानंतर हे सगळं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा हे समजून घेतल्यासारखंच आहे. आम्ही जिंकण्याच्या इर्षेने लढतोय.
सांगली लोकसभा मतदारसंघाबद्दल ठाकरेंनी काय मांडली भूमिका?
सांगलीमध्येही एक आमदार नाही, संघटन नाही अशा परिस्थितीत तुम्ही जागा घेतलीये. या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले, "आता असं आहे की, या विषयावर मी काहीही बोलणार नाही. कारण स्थानिक पातळीवर आम्ही बोललेलो आहोत. मला वाटतं की, स्थानिक पातळीवर तुमचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून आलेल्या बातम्या तुमच्याकडे आलेल्या असतील. आता मला त्यामध्ये जायचं नाही, कारण तो विषय आता संपला आहे", असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सांगली मतदारसंघाबद्दलची भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT