Yavatmal Washim Sanjay Deshmukh : विदर्भातील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला. शिवसेनेने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात एक नाव आहे संजय देशमुख यांचे. ते नेमके कोण आहेत आणि यवतमाळ वाशिममध्ये त्यांची ताकद किती हेच समजून घ्या. (Who is Sanjay Deshmukh?)
ADVERTISEMENT
यवतमाळ वाशिम... शिवसेनेचा बालेकिल्ला! पण, शिवसेनेत बंड झाले आणि हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंकडे गेला. तो पुन्हा काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतल्या फुटीपासूनच काम सुरू केले. त्याचबरोबर पूर्वीच्या शिवसैनिकाला पक्षात घेतले.
महायुतीचा उमेदवार ठरेना
या मतदारसंघातून सुरूवातीला भावना गवळींना तिकीट दिले जाईल, असे म्हटले जात होते; पण आता संजय राठोडांना तिकीट मिळू शकते. अशात संजय देशमुख हे महायुतीसमोर तगडं आव्हान असतील, असं म्हटलं जात आहे.
संजय देशमुख कोण आहेत?
मूळचे शिवसैनिक असलेल्या संजय देशमुख यांनी शिंदेंच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. आधी दिग्रस तालुका प्रमुख म्हणून काम केल्यानंतर १९९८ मध्ये संजय राठोड यांच्यासोबत ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही राहिले आहेत.
१९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवून आमदार झाले. १९९९ ते २००४ या काळात संजय देशमुख दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले.
हेही वाचा >> शिवसेना खासदाराचं तिकीट कापलं; शिंदे 'इथेही' उमेदवार बदलणार?
२००२ ते २००४ या काळात ते राज्यमंत्रीही राहिले. त्यांनी क्रीडा आणि खनिकर्म खात्याचे मंत्री म्हणून काम केले.
२००९ मध्ये या मतदारसंघाची पुर्नरचना झाली. दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला. त्यावेळी दारव्हाचे विधानसभा आमदार संजय राठोड यांनी संजय देशमुख यांचा पराभव केला.
यात महत्त्वाची बाब म्हणजे २००८ पासून ते आजपर्यंत ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत.
हेही वाचा >> माढासाठी पवारांचा नवा डाव, मोहिते पाटील हाती घेणार तुतारी
२०१९ मध्ये संजय देशमुख यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. यावेळीही संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला. पण, या निवडणुकीत संजय देशमुखांनी 75 हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती.
संजय राठोडांना शह देण्यासाठी ठाकरेंची खेळी
आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं, तर हा मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून भावना गवळींकडे राहिला आहे. तसं असलं, तरी दिग्रस मतदारसंघातील राजकारणात दोन्ही संजय महत्त्वाचे राहिले आहेत. आता लोकसभेच्या दृष्टीने संजय राठोडांभोवती चर्चा सुरू आहेत. ठाकरेंनी राठोडांना शह देण्यासाठी देशमुखांना मैदानात उतरवल्याचे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT