Lok Sabha election Maharashtra : महाराष्ट्रातील दहा खासदारांना तिकीटं न देण्याची 'ही' आहेत कारणं 

भागवत हिरेकर

• 06:25 PM • 03 May 2024

Maharashtra Lok Sabha election latest News : यावेळी महाराष्ट्रातील दहा विद्यमान खासदारांना तिकीट देणं टाळलं आहे.

महाराष्ट्रातील १० खासदारांची तिकिटं कापण्यात आली.

महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते.

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक महाराष्ट्र

point

कोणत्या पक्षांनी कापली विद्यमान खासदारांची तिकीटं?

point

शिवसेनेच्या किती खासदारांचा समावेश?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचलाय. सर्वच मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. आता महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांचं दान पदरात पडावं म्हणून पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसताहेत. पण, यातच एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे तिकिटं कापलेल्या खासदारांचा! यावेळी महाराष्ट्रातील १० विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्यात आली आहेत... हे खासदार कोण आहेत, ते कोणत्या पक्षाचे आणि त्यांना उमेदवारी का नाकारलीये. (Why Did Sitting MPs from maharashtra ticket cut by their Parties)

हे वाचलं का?

२०१९ मध्ये लोकसभेत गेलेल्या महाराष्ट्रातील ४८ पैकी १० विद्यमान खासदारांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आलीये, तर दोन खासदारांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. तिकीट नाकारण्यात आलेल्या खासदारांमध्ये सर्वच खासदार हे महायुतीतील पक्षाचे आहेत. या खासदारांचा पत्ता का कट झाला, हे समजून घेण्या आधी ते खासदार कोण आहेत? हे बघुयात...

यात पहिलं नाव आहे कृपाल तुमाने यांचं. त्यानंतर उत्तर पूर्व मुंबईचे मनोज कोटक, उत्तर मुंबईचे गोपाळ शेट्टी, जळगावचे उन्मेष पाटील, सोलापूरचे जयसिद्धेश्वर स्वामी, बीडच्या प्रीतम मुंडे, यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील, उत्तर मध्य मुंबईमधील पूनम महाजन आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित... या दहा जणांना इच्छा असून, त्यांच्या पक्षाने संधी नाकारली. 

खासदारांची तिकिटं का कापलीये?

भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारी नाकारण्याचं पहिलं कारण म्हणजे अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आलेली वस्तुस्थिती... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पक्षांनी प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात सर्वेक्षण केले होते, ज्यात त्यांच्या विरोधी वातावरण असल्याचे आढळून आले. त्यामुळे भाजपने शिंदेंकडे काही विद्यमान खासदारांना उमदेवारी न देण्याचा आग्रह धरला होता. 

याच गोष्टीमुळे शिवसेनेच्या कृपाल तुमाने, भावना गवळी आणि हेमंत पाटील  यांना धडपड करूनही उमेदवारी मिळू शकली नाही. हेमंत पाटील यांना देण्यात आलेली उमेदवारी शिवसेनेनं मागे घेतली आणि दुसरा उमेदवार हिंगोलीत दिला.

हेही वाचा >> ''त्यांची लायकी नाही, मी यादी दिली तर फिरणं मुश्कील होईल', पवारांचा मुंडेंना इशारा

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्याबाबतीत तर उलटंच घडलं. कारण ही जागा भाजपकडे गेली, तरी तेच उमेदवारी असतील असं म्हटलं जात होतं, पण भाजपनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याला भाजपतील स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट झाला. 

हीच गोष्ट भाजपच्या विद्यमान खासदारांबद्दल घडलीये... भाजपनं मुंबईतील तिन्ही मतदारसंघातील खासदारांना बाजूला ठेवून नवीन उमेदवार दिलेत. बीड, जळगाव, सोलापूर या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारही भाजपने बदललेत. लोकसभा मतदारसंघातील लोकांशी जास्त संपर्क नसणं, पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी होती. त्यामुळे भाजपनं जोखमी घेण्याचं टाळत उमेदवार बदलले.

हेही वाचा >> महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब! नाशिक, पालघर कुणाला?   

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीतून महायुतीच्या दोन खासदारांनी माघार घेतली. अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्यामुळे गजानन कीर्तिकर यांनी निवडणुकीत माघार घेतली. तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे आजारी आहेत. त्यामुळे भाजपने आता त्यांचा मुलगा अनूप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीने तिकिटं का कापली नाहीत?

आता मुद्दा महाविकास आघाडीने विद्यमान खासदारांची तिकिटे न कापण्याचा... महाविकास आघाडीकडे असलेल्या खासदारांची संख्या कमी आहेत. गेल्यावेळी काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. बाळू धानोकर चंद्रपूरमधून जिंकले होते, पण त्यांचं निधन झालं. तिथे काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोकर यांना उमेदवारी दिली. 

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबत कमी खासदार राहिले. पण, निष्ठावान शिवसैनिका संधी, असे धोरण अवलंबत ठाकरेंनी सगळ्यांनाच उमेदवारी दिली. दुसरीकडे शरद पवार यांनीही याच धोरणामुळे विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली. 

 

    follow whatsapp