Atul Parchure Death : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली आहे. अतुल परचुरे यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. यातून ते बरेही झाले होते. परंतू कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. परचुरेंच्या या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. (atul parchure passed away marathi actor)
ADVERTISEMENT
अतुल परचुरे यांनी केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर नाट्य विश्वात देखील मोलाचं योगदान दिलं आहे. मागील वर्षीच ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून काही प्रमाणात बरे झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी काम सुरू केलं होतं. पण आज म्हणजे वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.एक ताकदीचा अभिनेता, विनोदी अभिनेता आणि माणूस म्हणून उत्तम व्यक्ती अशी अतुल परचुरे यांची ओळख होती. अतुल परचुरे यांचे अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी सलोख्याचे संबंध होते.
डॉक्टरांकडून झालेली मोठी चूक
अतुल परचुरे यांनी काही महिन्यांपूर्वीच एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली होती. त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की, 'जेव्हा त्यांना कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे समजली तेव्हा ते डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले पण सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली.'
हे ही वाचा : Shiv Sena UBT: उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया, हृदयात होते ब्लॉकेज...नेमकं काय घडलं?
त्यावेळी अतुल परचुरे म्हणालेले, 'लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त मी कुटुंबीयांसह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेलो होतो. काही दिवसांनी मला काहीही खाण्यास त्रास होऊ लागला होता. मला मळमळ व्हायची. माझ्या भावाने मला काही औषधे दिली पण उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. मला समजले की, काहीतरी चुकीचं घडतंय. डॉक्टरांनी सांगितले की माझ्या यकृतामध्ये सुमारे 5 सेंटीमीटरची गाठ आहे, आणि ती कर्करोगाची गाठ आहे. त्यावेळी मी डॉक्टरला विचारलं की, मी बरा होईन की नाही तेव्हा त्यांनी मी एकदम बरा होईल असं सांगितलं होतं.'
चुकीचे उपचार आणि...
'उपचार सुरू झाले पण त्याचे विपरीत परिणाम होऊ लागले. चुकीचा आजार जडल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. प्रथमच योग्य रोग ओळखू न शकल्याने माझ्या स्वादुपिंडावर विपरीत परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे माझी प्रकृती सतत खराब होत गेली. मला चालताही येत नव्हते आणि बोलत असतानाही दम लागत होता. त्यानंतर डॉक्टरांनी दीड महिना वाट पाहण्यास सांगितले कारण, शस्त्रक्रियेमुळे कावीळ होण्याची आणि यकृतात पाणी भरण्याची भीती होती आणि त्यात मृत्यूही ओढावू शकत होता. यानंतर मी तात्काळ डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार घेतले.' असं अतुल परचुरे यांनी सांगितलं होतं.
हे ही वाचा : Mumbai Tak Chavadi : 'बाळासाहेबांनी राणेंना दिलेला 'हा' शाप', भास्कर जाधवांनी हे काय सांगितलं...
मराठीसह बॉलिवूडमध्येही अतुल परचुरेंची मुशाफिरी
अतुल परचुरे यांनी अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. खुमासदार विनोद आणि टायमिंग यामुळे त्यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली छाप सोडली होती. पण याचबरोबर त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील काम केलं होतं. 'सलाम-ए-इश्क', 'पार्टनर', 'ऑल द बेस्ट: फन बिगिन्स', 'खट्टा मीठा', 'बुड्ढा होगा तेरा बाप' आणि 'ब्रेव्ह हार्ट' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
ADVERTISEMENT