परिणीती चोप्रा स्टारर असलेला बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली. याशिवाय या सिनेमाचं एक पोस्टरही रिलीज करण्यात आलंय. मात्र सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर काहींनी पोस्टरला ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर अखेर दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
सायनाच्या बायोपिकच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सने पोस्टरच्या चित्रावरून ट्रोल केलं. युजर्सच्या म्हणण्याप्रमाणे, बॅडमिंटन खेळताना सर्विस ही खालच्या दिशेने केली जाते. मात्र मेकर्सने टेनिसनुसार पोस्टर तयार केलं आहे. यासाठी पोस्टरमध्ये शटलकॉक वरच्या बाजूला दाखवला आहे.
Too much speculation in the digital media about the poster… “looks like a tennis serve… Saina doing a Sania” etc…
Posted by Amol Gupte on Wednesday, March 3, 2021
पोस्टरच्या ट्रोलिंगच्या प्रकारानंतर सिनेमाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना उत्तर दिलंय. अमोल त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात, “पोस्टरसंदर्भात सोशल मीडियावर बरेच तर्क लावले जातायत. ‘पोस्टरमध्ये टेनिसची सर्विस वाटतेय…सायना सानिया झाली आहे…’ जर सायना फ्लाइंग शटल असेल तर हे स्पष्ट आहे की, तिरंग्याच्या रंगाच्या हातातील बँडसह त्या मुलीचा हात हा सायनाच्या उंचीवर पोहोचण्याच्या इच्छुक भारतीय मुलीचा हात आहे. राहुल नंदा यांच्या या उच्च संकल्पनेच्या पोस्टरचं दुर्दैवाने घाईघाईत प्रतिसाद देणार्याम जगाला सविस्तर पद्धतीने समजवावं लागतंय. काहीही अर्थशून्य बोलण्यापूर्वी विचार करा.”
अमोल गुप्ते दिग्दर्शित हा सिनेमा 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सायना नेहवालची कामगिरी आणि तिचा संघर्ष रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल. या सिनेमाचा टीझर शेअर करत परिणीतीने “सायनाचा टीझर, आता ट्रेलरही लवकरच!” असे कॅप्शन दिलंय. परिणीती शिवाय बँडमिंटनपटू सायना नेहवालनेही सोशल मीडियावर हा टीझर पोस्ट केलाय.
ADVERTISEMENT