महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे कायमच चर्चेत असतात. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय आङेत. ट्विटरवरून त्या नेहमीच सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडताना दिसतात. त्यावरुन अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. मात्र अमृता यांनी अनेक मुलाखतींमधून ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
सध्या अमृता या अशाच एका त्यांच्या पोस्टसाठी चर्चेत आहेत. ही पोस्ट म्हणजे ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवाला त्यांनी लावलेली हजेरी. काही दिवसांपूर्वीच अमृता यांनी कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावत असल्याचं सांगत एक फोटो पोस्ट केलेला. या फोटोनंतर अमृता यांनी कान्सला नेमकी का हजेरी लावलीय असा प्रश्न अनेकांना पडला. तशी राजकारणासोबत अमृता फडवीस यांना कलेची देखील आवड आहे. त्या स्वतः एका गायिका असून आतापर्यंत त्यांची बरीच गाणी प्रदर्शित झाली आहेत. मात्र अमृता या गाण्यानिमित्त कान्सला गेल्यात की अन्य काही कारणासाठी याबद्दल त्यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र आता या चर्चेला अमृता यांनी आपल्या नव्या पोस्टमधून पूर्णविराम दिलाय. कान्सला नेमक्या कोणत्या कारणानिमित्त त्या गेल्यात याबद्दलची माहिती त्यांनी नवीन पोस्टमध्ये फोटोंसहीत दिलीय.
अमृता फडणवीस यांनी २१ मे रोजी एक ट्विट केलं होतं. कान्स चित्रपट महोत्सवासाठी पोहोचलेल्या अमृता फडणवीस यांचं हे ट्वीट बरंच व्हायरल झालं होतं. त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करताना आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, “कान्समध्ये पोहोचले कान्स चित्रपट महोत्सव २०२२साठी आणि बेटर वर्ल्डसाठी.”अनेकांना या ट्विटमधील बेटर वर्ल्डचा अर्थ लागला नव्हता. मात्र आता अमृता यांनी नवीन पोस्टमधून थेटपणे आपण या महोत्सवाला का उपस्थित होतो याची माहिती दिलीय. “कान्स चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. अन्न, आरोग्य आणि विकास या विषयांसंदर्भातील जगृकतेसाठी हा कार्यक्रम होता. आयव्हरी कोस्टच्या फर्स्ट लेडी डॉमिनिक ओउटारा, राजकुमारी गिदा तलाल, अभिनेत्री शेरॉन स्टोन, किरा चॅम्पलिन यांच्यासोबत रेड कार्पेटवर उपस्थिती लावली. हा कार्यक्रम बेटर वर्ल्ड फाउण्डेशनने आयोजित केलेला,” असं अमृता यांनी फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. या फोटोंमध्ये अमृता यांनी पाश्चिमात्य पद्धतीचा करड्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.
अमृता फडणवीस या समाजकार्यामध्ये फार सक्रीय आहेत. त्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेल्या असून त्या या संस्थांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून प्रत्यक्षात फिल्डवर उतरुनही मदत करताना दिसतात. याच संस्थांमद्ये बेटर वर्ल्डचाही समावेश आहे. त्याच निमित्ताने अमृता कान्स महोत्सवाला हजर होत्या हे आता फोटोंवरुन स्पष्ट झालंय. सध्या अमृता यांच्या या रेड कार्पेटवरील लूकची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतेय.
ADVERTISEMENT