सुपरहीट अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटासमोर सध्या काही अडचणी निर्माण झाल्या आहे. अक्षयच्या ‘पृथ्वीराज’ या आगामी सिनेमाच्या नावाला करणी सेनेने विरोध दर्शवला असून, या चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे. करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंह राठोड यांनी सिनेमाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे. बॉलिवूड मधील पद्मावत, मणिकर्णिका या सिनेमांविरोधात करणी सेनेने विरोध दर्शवला होता.
ADVERTISEMENT
पृथ्वीराज चौहान एक महान योद्धा होते. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असल्याने या सिनेमाचे नाव ‘पृथ्वीराज’ कसे? सिनेमाच्या नावातही पृथ्वीराज चौहान यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा आणि त्यांचा आदर करण्यात यावा. तसेच अक्षयचा हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी या सिनेमाचे स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी अट देखील सुरजीत सिंह राठोड यांनी ठेवली आहे. जर आमचा सल्ला मानला नाही तर त्यांना वाईट परिणामांचा सामना करावा लागेल. ‘पद्मावत’ सिनेमावेळी संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काय झाले, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा सुरजीत सिंह यांनी दिला आहे.
‘पृथ्वीराज’मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर झळकणार आहे. मानुषीचा हा डेब्यू सिनेमा आहे. या सिनेमात ती पृथ्वीराज चौहान यांची पत्नी संयुक्ता यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सोनू सूद आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा सिनेमा आदित्य चोप्राची निर्मिती आहे.
ADVERTISEMENT