चंद्रमुखी सध्या सगळीकडे फक्त याच सिनेमाची चर्चा आहे.. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कोणतीही कसर सोडलेली नाही.. आता फायनली चंद्रमुखी रिलीज झाला आहे. आणि तुम्हांला ही उत्सुकता असेल की नेमका हा सिनेमा कसा आहे .. त्याची … तर पाहूया चंद्रमुखी सिनेमा नेमका आहे कसा ते….
ADVERTISEMENT
मराठीतील प्रथितयश कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवरून बेतलेलं हे कथानक एक यशस्वी राजकीय नेता दौलत आणि तमाशातील कलावंतीण ‘चंद्रमुखी’ याची ही प्रेम कहाणी. ही कादंबरी बऱ्याच जणांनी वाचलेली आहे. तरीही या कथानकाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर
दौलतराव – एक ध्येयधुरंधर राजकारणी. आपला ’संसार’ सांभाळत लोककलेची कदर करणारा रसिक. आणि ती – चंद्रमुखी! नावाप्रमाणेच देखणी, तमाशातली शुक्राची चांदणी.
नृत्यकौशल्य, सौंदर्याबरोबरच ’बाई’पणाचा शाप घेऊन आलेली कलावंतीण.
मग ’लाल दिवा’ आणि ’घुंघरा’च्या गुंतावळीतून निर्माण झाली ही चंद्राची रसिली कहाणी…
कथानकामध्ये दिग्दर्शक प्रसाद ओकने फ्लॅशबॅक तंत्राचा प्रभावी वापर केलेला आहे. खासदार दौलतराव, त्याची बायको डॉली , त्याचा सासरा दादासाहेब, साडू नानासाहेब, नानासाहेबाची बायको ही पात्रे एका बाजूला तर चंद्रमुखी, तिची आई व त्यांचा साथीदार हे दुस-या बाजूला आहेत. एकमेकांविरोधी असणा-या या ठेवणीमुळे नाटयाची एक घट्ट वीण कथानकामध्ये गुंफली आहे. सर्वस्वी भिन्न प्रकृतीच्या या दोन दुनियेतली माणसं अशी जवळजवळ आल्यामुळे वाढीस लागलेले प्रेम, वैर, हे या सिनेमातून उत्तम रित्या सादर होतं.
संगीत हा या सिनेमाचा आत्मा आहे. अजय-अतुल या जादुई संगीतकारांनी चंद्रमुखीचं प्रत्येक गाणं इतकं तन्मयतेनं केलं आहे की कथानकासोबतच अजय अतुलच्या संगीतामुळे हा सिनेमा एका निराळ्याच उंचीवर जाऊन पोहचतो. गुरू ठाकूरची लेखणी आणि अजय-अतुलचा स्वरताल म्हणजे एक नंबर बहार आहे.
एका बाजूला साजशृगांर आणि दुसरीकडे राजकारणाची काळी बाजू या आपल्या लेन्समधून उत्तमरित्या टिपतो तो या सिनेमाचा सिनेमँटोग्राफर संजय मेमाणे..संजय मेमाणेचा कँमेराने सिनेमात कमाल केली आहे…
कच्चा लिंबू, हिरकणी नंतरचा प्रसाद ओकचा दिग्दर्शक म्हणून चंद्रमुखी हा पुढचा सिनेमा.. वरती सांगितल्याप्रमाणे प्रसाद ओक हे दिग्दर्शक म्हणून चंद्रमुखीतून आधीपेक्षा जास्त प्रगल्भ झाला आहे… कादंबरीवर बेतलेला सिनेमा असं फक्त या सिनेमापुरतं होत नाही. सिनेमात प्रसादने काढलेल्या जागा, कलाकारांकडून करून घेतललं काम, आणि सर्व तांत्रिक अंगाचा उत्तम वापर प्रसाद ओकने अगदी प्रभावी केलाय..
निर्मितीमूल्यात कोणतीही कसर न सोडल्यामुळे चंद्रमुखी प्रत्येक टप्प्यांवर भव्य, सुंदर आणि प्रभावी वाटत राहतो ह्याचं श्रेय या सिनेमाचा निर्माता अक्षय बर्दापूरकरला द्यायला हवं
अमृता खानविलकर म्हणजेच चंद्रमुखीची चंद्रा.. अमृतासाठी हा सिनेमा यातली भूमिका ही तिच्या करिअरमधल्या टप्प्यातली सर्वात महत्वाची आणि उत्तम भूमिका आहे. चंद्रा तिने साकारली नाहीये तर जगली आहे. मग तिचं नृत्य असो, दौलतसोबतचं प्रेम असो विरह असो.. अमृताने चंद्रमुखीच्या प्रत्येक फ्रेममध्ये लाजवाब अदाकारी केली आहे.. तिने या भूमिकेसाठी केलेली मेहनत पदोपदी जाणवत राहते.
खासदार दौलतराव म्हणजे करारी लोकनेता आणि रूबाबदार व्यक्तिमत्व आदिनाथ कोठारेने या भूमिकेत कमाल केली आहे. चंद्रावर जडलेलं प्रेम, राजकारणात येणारं अपयश, बायकोसोबतचा कलह हे आदिनाथने उत्तम मांडलं आहे.
या दोन भूमिकांसोबतच दौलतरावाच्या बायकोच्या भूमिकेतली डॉलीही तितकीच प्रभावी साकारली आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने, आपल्या नवऱ्यावर जिवापाड प्रेम करणारी डॉली, नवऱ्याचं चंद्रावरचं प्रेम समजल्यावर कोलमडून पडणारी डॉली मृण्यमयीने उत्तम साकारली आहे..
बाकी मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर,सुरभी भावे,वंदना वाकनीस,अशोक शिंदे, राधा सागर यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
या सिनेमातलं सरप्राईज पँकेज म्हणजे अभिनेता समीर चौघुले. समीरने साकारलेला बत्त्याशा सर्व प्रमुख व्यक्तिरेखांतही उठून दिसतो… समीरच्या वाट्याला आलेली आजवरची ही उत्तम भूमिका आहे..
या सिनेमाचं अजून एक यश म्हणजे या सिनेमाचे चिन्मय मांडलेकरने लिहिलेले संवाद, प्रत्येक सीनला कलाकाराच्या तोंडी आलेले हे संवाद अतिशय चपखल आहेत..
उत्तम निर्मितीमूल्ये, तांत्रिक बाजू, संगीत, कथा,संवाद, दिग्दर्शन, आणि कलाकारांचा उत्तम अभिनय असलेल्या चंद्रमुखी या सिनेमाला मी देतोय ४ स्टार..
चंद्रा आणि दौलतची ही प्रेमकहाणी,त्याला दुसरीकडे असलेला राजकारणाचा ज्वर, कट कारस्थानं, उत्तम नृत्य ,संवाद,संगीताची झालेली सांगड ,आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यासाठी चंद्रमुखी एकदा पाहायलाच हवा
ADVERTISEMENT