मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र ‘न्यू नॉर्मल’ होऊन जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, हॉटेल्स, मॉल्स सुरु झाल्यानंतर आता सिनेसृष्टीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्या जोमाने सज्ज झाली आहे. अनेक नवनवीन चित्रपटांची घोषणा होत असतानाच, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. खरं तर ‘झिम्मा’ नावाचा चित्रपट येत असल्याची आधीपासूनच चर्चा होती मात्र यात कलाकार कोण असणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर या चित्रपटातील कलाकार आपल्या समोर आले असून यात चित्रपटसृष्टी, रंगमंच, टेलिव्हिजन गाजवणारे कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या कसलेल्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनलॉकनंतर प्रदर्शित होणारा हा पहिला मोठा मराठी सिनेमा आहे.
ADVERTISEMENT
‘नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे पोस्टरच इतके कमाल आहे. पोस्टरमधील स्टारकास्ट पाहता ‘झिम्मा’ झकास आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा असणार हे नक्की! पोस्टरवर असलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील अभिनेत्रींमध्ये सिद्धार्थ एकमेव तरुण अभिनेता आहे. त्यामुळे ‘झिम्मा’मध्ये काहीतरी ट्विस्ट असणार याचा अंदाज येतोय. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान, हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच धमाल चित्रपट दिले. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक संदेशही दिला त्यामुळे आता ‘झिम्मा’मध्ये काय असणार यासाठी मात्र २३ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
ADVERTISEMENT