यशराज फिल्मस ‘पृथ्वीराज’ च्या माध्यमातून प्रथमच ऐतिहासीक चित्रपट बनवत आहे. निर्भीड आणि शक्तीमान सम्राट पृथ्वीराज चौहानचे शौर्य या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. सुपरस्टार अक्षयकुमार यामध्ये महान योध्दा पृथ्वीराज चौहानची भुमिका निभावत आहे ज्याने निर्दयी आक्रमक मोहम्मद घोरीच्या विरुध्द पराक्रम गाजवला होता. अक्षयकुमारने नुकताच या फिल्मचा टिजर सोशल मिडियावर पोस्ट केला ज्याला अर्थातच प्रेक्षकांकडून ऊत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या टिजरमधून स्पष्ट झाले की माजी मिस वर्ल्ड 2017 मनुषी छिल्लर ‘पृथ्वीराज’ मध्ये राजकुमारी संयोगिताच्या भुमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडमधील आपल्या पदार्पणाबाबत ही अतिशय सुंदर अभिनेत्री खूपच रोमांचीत झाली आहे.
ADVERTISEMENT
मनुषीने प्रियांका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी भारतासाठी मिस वर्ल्डचा किताब जिंकून देण्याची अभिमानास्पद कामगिरी बजावली होती. आपल्या बॉलिवूड पदार्पणाबाबत बोलताना मनुषीने सांगितले की, “वायआरएफ आणि दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची मी खूपच आभारी आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला तसेच मी महान राजकुमारी संयोगिता हिची भुमिका निभावू शकेन असा आत्मविश्वास मिळवून दिला. माझ्यासाठी याहून मोठे बॉलिवूड पदार्पण असूच शकत नव्हते. राजकुमारी संयोगिताचा रोल स्क्रीनवर करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी एक बहुमानच होता.संयोगिताची तत्वे, आनंदी वृत्ती, धैर्य तसेच तिच्याविषयीची आदरभावना यामुळे तिला महानत्व प्राप्त झाले आहे. रोलच्या निमित्ताने मला तिच्याविषयी खूप काही जाणून घेऊन राजकुमारी संयोगिता स्क्रीनवर साकारण्यासाठी तयारी करण्याची संधी मिळाली हे माझे सुदैव मानते. मला आशा आहे की मी राजकुमारी संयोगिताला आपल्या अभिनयाच्या माध्यमातून न्याय देऊ शकली आहे. तिची कथा प्रत्येक प्रेक्षकाला आवडेल याबाबत मी रोमांचीत आहे.”
‘पृथ्वीराज’मध्ये मनुषीने सुपरस्टार अक्षयकुमारच्या नायिकेची भुमिका बजावली आहे. मनुषीने अक्षय कुमारकडून मिळालेला भरपूर पाठिंबा आणि तिच्यातील क्षमतेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.मनुषीने पुढे सांगितले की, “या चित्रपटासाठी मी माझे अंत:करण, आत्मीयता आणि अश्रूही समर्पीत केले आहेत. त्यामुळे वास्तव जीवनातील एका महान व्यक्तीमत्वाचे मोठ्या स्क्रीनवर वर्णन करण्याचा माझा प्रयत्न लोकांना आवडेल, अशी आशा वाटते. चित्रपटाच्या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान अक्षय सरांनी मला केलेल्या प्रचंड सहकार्याबद्दल मी त्यांची खूपच ऋणी आहे. त्यांची कामाबाबत तत्वे, या कलाकृतीविषयी समर्पण माझ्यासाठी एका प्रेरणेप्रमाणेच आहे.‘पृथ्वीराज’ विषयी मी खूपच आशावादी आहे. ऊत्कट प्रेम, महान शौर्य आणि निश्चयी धाडसाची ही कथा जगभरातील प्रेक्षकांना मनापासून आवडेल अशी खात्री वाटते. माझ्या कुटुंबालाही या चित्रपटातील काम खूप पसंत पडेल, अशी आशा वाटत असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याबाबत मी खूपच ऊत्साही असल्याचे तिने शेवटी सांगितले.2022 मध्ये मनुषीचे पदार्पण ही बॉलिवूडमधील एक बहुप्रतिक्षीत घटना असणार आहे. यशराज फिल्मस द्वारे निर्मित ‘पृथ्वीराज’ चे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. द्विवेदी यांनी यापुर्वी टेलिव्हिजनवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘चाणक्य’ या भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली राजकीय धोरणकर्त्याच्या जीवनावर आधारीत मालिकेसोबतच अनेक पुरस्कार जिंकलेल्या ‘पिंजर’चेही दिग्दर्शन केले होते. ‘पृथ्वीराज’ जगभरात एकाच वेळी दि. 21 जानेवारी 2022 या दिवशी प्रदर्शीत केला जाणार आहे.
ADVERTISEMENT