बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमाची सध्या बरीच चर्चा आहे. अभिनेत्री आलिया भट्ट यात गंगुबाईची भूमिका साकारतेय. सिनेमाबद्दल दिवसेंदिवस उत्कंठा वाढत असून, अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की नक्की ही गंगूबाई काठियावाडी आहे तरी कोण आणि तिने असं काय केलं? ज्यामुळे तिच्यावर इतका मोठा सिनेमा तयार होतोय… तर आज जाणून घेऊया की गंगुबाई काठियावाडी कोण होती?
ADVERTISEMENT
मुंबईतील कामाठीपुरा परिसर म्हणजेच रेड लाईट एरिया. प्रत्येक मुंबईकर या भागातून जाताना जरा दबकूनच जातो. जशी वर्ष सरत गेली, तशी कामाठीपुऱ्यातील परिस्थिती ही बदलत गेली. मात्र देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मनात आजही एक नाव कायम आहे… ते म्हणजे गंगुबाई काठियावाडी!
कामाठीपुऱ्यातील प्रत्येक घरात आजही गंगूबाईचा फोटो आहे आणि या भागात गंगुबाईचा पुतळा आहे; ज्याला आजही तितक्याच श्रद्धेने पूजलं जातं. यामागचं कारण म्हणजे गंगुबाई काठियावाडी या कामाठीपुऱ्याची राणीच होत्या. गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. यातील माहितीनुसार गंगुबाईचं खरं नाव गंगा हरजीवनदास असं होतं.
गुजरातमधील काठियावाडीत तिचा जन्म झाल्याने कालांतराने तिचं नाव गंगुबाई काठियावाडी असं झालं. गंगुबाईला लहानपणापासूनच सिनेमाचं वेड होतं. मुंबईत जायचं आणि अभिनेत्री व्हायचं हे एक स्वप्न उराशी तिने बाळगलं होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. तिच्या वडिलांकडे काम करणाऱ्या अकाऊंटट रमणीकलाल सोबत तिचे प्रेमसंबंध सुरू झाले.
तिला अभिनेत्री व्हायचं होतं, पण वडिलांचा विरोध असल्याने तिने आधी रमणीकलाल सोबत लग्न केलं आणि मुंबईला आली. मात्र रमणीकलालने मुंबईत आल्यावर आपले खरे रंग दाखवले. केवळ ५०० रूपयांच्या आमिषाने रमणीकलालने गंगुबाईला कुंटणखान्यात विकले आणि गंगुबाई जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलली गेली.
गंगुबाईचा पुढचा प्रवास, तर अजून नरक यातनांतून जाण्याचा होता. मुंबईत त्या काळात पठाण गँगची चांगलीच दहशत होती. करीम लाला हा या सर्व पठाणांचा कैवारी होता. मुंबईत करीम लालाची जितकी दहशत होती, तितकाच त्याचा मानही होता. या गँगमधील काही पठाण कामाठीपुऱ्यात यायचे. यातील एका पठाणाने गंगुबाईवर प्रचंड शारीरिक अत्याचार केले.
अत्याचाराची परिसीमा गाठूनही हा पठाण काही शांत बसेना. झालेल्या अत्याचारामुळे गंगुबाईला प्रचंड त्रास सहन करावा लागला. खूप वेळा ती आजाराही पडली. तरीही पठाणाचे गंगुबाईवरील अत्याचार सुरूच होते. वेश्या असल्याने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत कुणाला सांगायचं असाही प्रश्न गंगुबाईसमोर होता.
त्याचवेळी तिला करीमलाला विषयी माहिती मिळाली. इतर महिलांप्रमाणे गंगुबाई अन्याय सहन करणारी नव्हती. तिने या पठाणाचा निकाल लावायचा पण केला. तसं करीम लालाला गाठणं सामान्य माणसाला त्यावेळी शक्य नव्हतं; पण गंगुबाईने हिंमत करून करीम लाला भेटलीच.
आपली फिर्याद त्याच्याकडे मांडली. आपल्यावर अन्याय करणारा पठाण तुमच्याच गँगचा आहे. त्याला अद्दल घडवा मी तुमची आयुष्यभर सेवा करीन, असं गंगुबाई करीमलालाला म्हणाली. करीमलालाने गंगुबाईला आपलं बहिण मानलं आणि तिच्यावर अन्याय करणाऱ्या पठाणाला चांगलीच अद्दल घडवली. गंगूबाईला थेट करीमलालाने केलेली मदत तिचे दिवस पालटण्यासाठी निमित्तच ठरले.
इथूनच गंगुबाई काठियावाडीचा कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी होण्याची सुरुवात झाली. कामाठीपुऱ्यातील देहविक्री करणाऱ्या स्त्रिया आपले प्रश्न घेऊन गंगुबाईकडे येऊ लागल्या आणि गंगुबाई देखील आपला मानलेला भाऊ करीमलालाच्या मदतीने हे सारे प्रश्न सोड़वू लागली. गंगुबाईने कामाठीपुऱ्यात त्यानंतर कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरोधात देहविक्री करण्याची जबरदस्ती करू दिली नाही. गंगुबाईच्या दहशतीमुळे कित्येक वर्ष कामाठीपुऱ्यात ही गोष्ट पाळलीही जायची.
कामाठीपुऱ्यातील वेश्यावस्तीचं स्थलांतर करावं म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र गंगुबाई कामाठीपुऱ्यातील वेश्यावस्ती हटणार नाही, यावर ठाम होती. यासाठी तिने बरेच दिवस आंदोलनही केलं. गंगुबाई आपल्या मतांवर ठाम होती. तिने कामाठीपुऱ्यातून वेश्यावस्ती शेवटपर्यंत हटू दिली नाही.
गंगुबाई काठियावाडी देहविक्रीच्या व्यवसायात ढकललेल्या गेलेल्या हजारो स्त्रियांचा आवाज बनली. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत गंगुबाईने कामाठीपुऱ्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील पीडित महिलांचेही प्रश्न सोडवले. कालांतराने गंगुबाईचं वृद्धापकाळाने निधन झालं. पण तिने वेश्यावस्तीत केलेल्या अथक परिश्रमामुळे तिला आजही कामाठीपुऱ्यात तितकाच मान आहे. म्हणून प्रत्येक घरात तिचा फोटो आहे आणि या भागात तिची आठवण म्हणून एक छोटासा अर्धपुतळाही बसवण्यात आला आहे.
आजही तिथे असणारी प्रत्येक स्त्री अगदी मनापासून गंगूबाई काठियावाडीला मनातल्या मनात का होईना दुआँच देत असते..
ADVERTISEMENT