Naal 2 Movie: मुंबई: ‘नाळ’च्या अभुतपूर्व यशानंतर आता झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे (nagaraj manjule) पुन्हा एकदा घेऊन येत आहेत ‘नाळ भाग 2’. (Naal 2) 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाची प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडली गेली. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपले नाव कोरले. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांना राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण पदक, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. या चित्रपटाने दिवाळीतही चित्रपटगृहात ‘हाउसफुल्ल’चे बोर्ड झळकवले. (this year diwali will be more bang nagaraj manjule is coming with naal 2 marathi movie)
ADVERTISEMENT
चित्रपटाची भावनिक कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण बाज, श्रवणीय गाणी, छायाचित्रण या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या. ‘आई मला खेळायला जायचंय’ या गाण्याने तर प्रेक्षकांवर जादूच केली. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘चैत्या’च्या त्या निरागस भावविश्वात नेण्यासाठी सुधाकर रेड्डी यक्कंटी सज्ज झाले आहेत. ‘नाळ भाग 2’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला परत एक ‘सुपरहिट’ सिनेमा मिळणार, हे निश्चित!
नाळ 2 चा टिझर
नुकतेच ‘नाळ भाग 2’चे टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. आता ‘नाळ भाग 2’मध्ये कोण कोण कलाकार असणार, नेमके यात काय पाहायला मिळणार आणि चित्रपटातील गाणी कशी असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये आता कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा >> Sharad Pawar: ‘…हे घटनात्मक पाप आहे’, पवार गटाचा राहुल नार्वेकरांवर मोठा आरोप
दरम्यान टीझरमधील छायाचित्रण बघून ‘नाळ 2’ही कमाल असणार यात शंकाच नाही. येत्या दिवाळीत म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी हा ‘नाळ भाग 2’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी अधिकच धमाकेदार असणार आहे.
चित्रपटाविषयी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी म्हणतात, ” माझ्या पहिल्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आई मुलाच्या नात्यातील खूप साधी अशी ही गोष्ट होती. आता हीच गोष्ट पुढे जाणार आहे. ‘नाळ भाग 2’ ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव खूपच अनोखा होता आणि आताही आहे. नागराज मंजुळे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता या सगळ्याच भूमिकेत अव्वल आहेत आणि झी स्टुडिओजबद्दल सांगायचे तर त्यांनी आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोघांबरोबर आता माझीही ‘नाळ’ जोडली गेली आहे. चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे आणि चैत्या त्याच्या खऱ्या आईकडे निघाला आहे, आता त्याचा हा प्रवास त्याला कुठे नेणार, याचे उत्तर लवकरच चित्रपटगृहात मिळणार आहे.”
हे ही वाचा >> Nitin Gadkari: ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’, नितीन गडकरींवर सिनेमा; कोणी साकारली भूमिका?
झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘अमराठी दिग्दर्शकाने मराठी चित्रपट बनवावा आणि त्याच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, हीच खरंच कौतुकाची बाब आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाने प्रेक्षकांचीही वाहवा मिळवली. या यशानंतर आता ‘नाळ भाग २ येतोय. यातही प्रेक्षकांना काहीतरी सर्वोत्कृष्ट पाहायला मिळणार आहे.’
ADVERTISEMENT