Diwali 2024 Calendar : सध्या सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सूरू आहे. बाजारपेठा चमचमत्या लाईटींगने सजल्या आहेत. तर रांगोळ्याच्या रंगाचाही ढीग नजरेस पडतोय. अशात आता सगळ्यांना प्रश्न पडला आहे की दिवाळी कधी आहे. खरं तर 28 ऑक्टोबरला वसुबारस आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबरपर्यंत ही दिवाळी साजरी होणार आहे. त्यामुळे या दिवसात, कोणत्या दिवशी नेमकं काय असणार आहे? आणि त्याचा मुहूर्त काय असणार आहे? हे जाणून घेऊयात. (diwali 2024 when in dhanteras choti diwali bhai dooj diwali padwa date timing and muhurt)
ADVERTISEMENT
वसुबारस कधी?
यंदाच्या वर्षी वसुबारस हे 28 ऑक्टोबरला आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एक वेळचे जेवण करून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे श्लोक म्हणून सुर्यास्तानंतर पूजा करतात. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात. अशावेळेस गाय वासराच्या मूर्तीची देखील पूजा करतात. तेही शक्य नसल्यास गायीच्या चित्राची पूजा करतात.
'या' दिवशी धनत्रयोदशी
धनत्रयोदशीची तिथी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांनी सूरू होणार असून 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी पुष्कर योग तयार होतं आहे. यावेळी करणे अत्यंत शुभ मानले जाते. पहिला मुहूर्त - 29 ऑक्टोबर सकाळी 6 वाजून 31 मिनिटांपासून ते 10 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे. तर दुसरा मुहूर्त हा दुपारी 11 वाजून 42 मिनिटांपासून ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. आणि संध्याकाळचा मुहूर्त- संध्याकाळी खरेदी करता येते. या दिवशी संध्याकाळचा मुहूर्त 5 वाजून 38 मिनिटांपासून ते 6 वाजून 4 मिनिटांपर्यंत असेल.
पुजेचा मुहूर्त : धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा संध्याकाळी केली जाते. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटं ते 8 वाजून 31 मिनिटं या वेळेत पूजा करता येईल. याचा अर्थ धनत्रयोदशीच्या पूजेसाठी तुम्हाला 1 तास 42 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल.
हे ही वाचा : Rangoli Designs for Diwali 2024 : दिवाळीत झटपट दारात काढाल 'या' रांगोळ्या, वेळेचेही होईल बचत!
नरक चतुर्दशी 2024 तिथी आणि योग्य वेळ
ज्योतिषांच्या माहितीनुसार, यंदा छोट्या दिवाळीचा उत्सव 30 ऑक्टोबर 2024 ला साजरा केला जाणार आहे. नरक चतुर्दशीची सुरुवात 30 ऑक्टोबरला दुपारी 1.16 वाजता होणार आहे. तर पुढच्या दिवशी 31 ऑक्टोबरला दुपारी 3.35 वाजता याचा समारोप होणार आहे. हा उत्सव सायंकाळी साजरा केला जातो. त्यामुळे यमाचा दिवा 30 ऑक्टोबरला लावणे शुभ ठरेल. नरक चतुर्दशीला सूर्यास्तानंतर प्रदोष काळात यमाचा दिवा पेटवला पाहिजे. दिवा लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मृत्यूचं भय राहत नाही. तसच प्रार्थना केली जाते की, यमदेव नरकाचे दरवाजे बंद करा. आमचं आरोग्य चांगलं ठेवा. या दिवशी यमराजाचीही पूजा केली जाते आणि घरात दिवे लावले जातात.
'या' दिवशी लक्ष्मी पूजन
शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.
जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणिधनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥अशी कुबेराची प्रार्थना करावी.
या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात
.लक्ष्मीपूजन मुहूर्त (1 नोव्हेंबर 2024, शुक्रवार)दु. 3 ते 5.15, सायं. 6 ते 8.30, रात्री 9.10 ते 10.45
हे ही वाचा : Diwali Padwa 2024 : यंदा दिवाळी पाडवा कधी आहे? बलिप्रतिपदाचे महत्व आणि कथा वाचा
दिवाळी पाडवा कधी आहे?
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. वहीपूजन मुहूर्त (2 नोव्हेंबर 2024 शनिवार) पहाटे 4.10 ते 6.40, सकाळी 8 ते 10.50
'या' तारखेला भाऊबीज
यंदा 3 नोव्हेंबरला भाऊबीज आहे. नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज (Bhaubeej) सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.
ADVERTISEMENT