राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये आता दोषारोपांचा खेळ सुरू झाला आहे. कर्नाटकचे गृहमंत्री आणि काँग्रेसचे निवडणूक प्रभारी जी. परमेश्वर यांनी पराभवासाठी महाविकास आघाडीमधील संवादाच्या अभावाला कारणीभूत ठरवलं आहे. सहकार्य आणि समन्वयाचा महाविकास आघाडीमध्ये अभाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जी. परमेश्वर म्हणाले की, काँग्रेसने अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेनेला पूर्ण पाठिंबा दिला नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाही तसाच दृष्टिकोन होता. तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सहकार्याचा अभाव दिसून आला. अनेक ठिकाणी, आम्ही त्यांच्यासाठी काम केलं नाही आणि त्यांनीही आमच्यासाठी काम केलं नाही. जेव्हा आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला हवा होता आणि शिवसेनेनेही आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता असं म्हणत जी. परमेश्वर यांनी आाता खळबळ उडवून दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Rohit Pawar : रोहित पवार पिछाडीवर पडल्याच्या धक्क्यात 75 वर्षांच्या समर्थकाचा मृत्यू, ट्विट करुन...
राज्यात 20 नोव्हेंबररोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल काल 23 नोव्हेंबररोजी लागला. या निवडणुकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा दारुन पराभव झाला. एकीकडे महायुतीला 233 जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीला फक्त 49 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. काँग्रेसला जास्त जागा मिळणं अपेक्षित होतं असं जी. परमेश्वर म्हणाले आहेत. "काँग्रेस विदर्भात जास्त जागा जिंकेल अशी अपेक्षा होती. आम्हाला 50 पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असं वाटत होतं, पण फक्त 8 जागा मिळवता आल्या. 105 जागांपैकी आम्हाला 60-70 जागा जिंकू, अशी अपेक्षा होती, पण आम्हाला जे अपेक्षित होतं ते साध्य झालं नाही," असं ते म्हणाले.
चंद्रचूड यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहीलं जाणार : राऊत
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या पराभवासाठी थेट सरन्यायाधीशांना कारणीभूत ठरवलं आहे. देशाच्या सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेशी संबंधी निर्णय लवकर द्यायला हवा होता. अडीच वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशाला उबवता आहात? असा सवाल करत संजय राऊत यांनी निकालानंतर प्रतिक्रिया दिली. धनंजय चंद्रचूड हे बाहेर उत्तम प्रोफेसर किंवा भाषणं देण्यासाठी चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून घटनात्मक पेचावर त्यांनी योग्य निर्णय दिला नाही. हा निर्णय दिला असता तर हे चित्र दिलं नसतं. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. पक्षांतरासाठीच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवून ते गेलेत. दहाव्या शेड्यूलची भीतीच आता राहिली नाही. ती भीती न्यायमुर्तींनीच घालवली. या सर्व गोष्टींना जस्टीस चंद्रचूड जबाबदार आहेत, त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहीलं जाईल असं संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT