अमोल कोल्हे यांनी आज बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत भाषण केलं. बारामतीमध्ये यंदा पहिल्यांदाच दोन पवार एकमेकांविरोधात मैदानात असणार आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार हे मैदानात आहेत. यंदाची बारामतीमधील ही लढत अटीतटीची असणार आहेत. आजच्या सांगता सभेत अजित पवार यांच्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तुफान बरसले.
ADVERTISEMENT
काय म्हणाले अमोल कोल्हे?
महाराष्ट्रात लोकं आता म्हणतात, मतदान 20, निकाल 23 आता घरी पाठवायचे शिंदे, अजितदादा आणि फडणवीस..
अजितदादा म्हणाले अमोल कोल्हेंनी पक्ष बदलला.. पण माननीय दादा मी फार लहान कार्यकर्ता आहे ओ.. आमचे काका सुद्धा एवढे मोठे असते आणि काकांनी वारंवार आम्हाला मंत्रिपदाची संधी दिली असती तर आमचं चित्र वेगळं असतं.
अमोल कोल्हेने पक्ष बदलला पण अमोल कोल्हेने पक्ष चोरला नाही. चिन्ह चोरलं नाही.
कदाचित एजन्सीच्या प्रभावामुळे आपल्याला विसर पडला असेल. पण तुम्ही विधानसभेत छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणाला होतात. तेव्हा आता तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. त्याच भाजपने आपल्या विरोधात आपल्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं होतं.
हे आंदोलन सुरू असताना छातीचा कोट करून तुमची बाजू मांडणारा हा अमोल कोल्हेच होता. पण आता तोच अमोल कोल्हे तुमच्यासाठी कलाकार राहिला नाही तर नकलाकार झाला आहे. मला तुम्ही नकलाकार म्हणतात हे महत्त्वाचं नाही. अमोल कोल्हेसाठी हे महत्त्वाचं आहे की, भले त्याला नकलाकार म्हणू देत पण त्याला कोणी गद्दार म्हणत नाही हे महत्त्वाचं.
म्हणून आज आवर्जून आलो आहे. ही निवडणूक अमोल कोल्हेवर कोण काय बोललंय ही नाहीएच.. ही निवडणूक महाराष्ट्र धर्म टिकविण्याची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे.
परवा गेलो होतो चिपळूण-संगमेश्वरला.. इथे गेल्यावर महाराष्ट्राची 350 वर्ष काळजाची जखम ही भळभळायला सुरुवात होते. त्याच संगमेश्वरच्या वाड्यात 350 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीराजांना कैद करण्यात आली.
ज्या राजाने हातात समशेर घेतली तर लखलखती पृथ्वी निर्माण करायचा. ते छत्रपती संभाजीराजे कैद झाले.. का झाले? गद्दारीमुळे झाले.. छत्रपती संभाजीराजे कैद झाले याची किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागली.
म्हणून पुन्हा महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीचं पीक फोफवायला लागलं असेल तर ते जागेवर छाटणं हे तुमचं-माझं प्रत्येकाचं कर्तव्य हे सांगायला आलोय.
आता मला काल मला सल्ला दिला होता, बाबा चष्मा तपासून बघ.. माननीय दादा चष्मा महत्त्वाचा नसतो, नजर महत्त्वाची असते. दादा महाराष्ट्र तुम्हाला कोणत्या नजरेने पाहतो याचं आत्मपरिक्षण करणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT