Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला 160 ते 162 जागा मिळतील आणि आम्ही सरकार स्थापन करतोय असा दावा संजय राऊत यांनी केला. राज्यात काल विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. त्यानंतर काल संध्याकाळीच एक्झिट पोलही समोर आले. वेगवेगळ्या संस्थांनी तयार केलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात महायुतीचं सरकार येणार अशी शक्यता वर्तवली आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये अपक्षांचा बोलबाला होईल अशी असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर आज संजय राऊत यांनी मात्र एक्झिट पोलचे सर्व दावे फेटाळून लावत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील निवडणुकांमध्ये महायुतीने पैसे वाटले, पैशांचा पाऊस पाडला गेला, यंत्रणांचा गैरवापर केला, मात्र ही निवडणूक महाराष्ट्र धर्मावर लढली गेली आहे. त्यामुळे राज्याच्या जनतेने पैशांचा प्रवाहात न वाहता महाराष्ट्रासाठी मतदान केलं असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र हवा की अदानी राष्ट्र हवा असं आम्ही सांगतच होतो. आता ट्रम्प प्रशासनाने अदानीविरोधात अदानींविरोधात अमेरिकेत अटर वॉरंट काढलंय असंही संजय राऊत म्हणाले आहेत. येत्या 23 तारखेला 10.30 ते 11 वाजेपर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होईल हे आम्ही स्पष्ट करणार असं संजय राऊत म्हणाले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आमच्या पक्षाला मिळून सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जागा मिळतील असं संजय राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा >>Gautam Adani US Bribe Case : गौतम अदानी आणि पुतण्यातवर लाच दिल्याचे आरोप, अमेरिकेतलं प्रकरण काय?
एक्झिट पोलचे दावे राऊतांनी फेटाळले
एक्झिट पोलनुसार हरयाणामध्ये काँग्रेस जिंकणार होती, लोकसभेत मोदींना 400 पेक्षा जास्त जागा मिळणार होत्या. दोन-चार हजार लोकांचा सॅम्पल सर्व्हे घेऊन हा जिंकणार तो जिंकणार सांगायचं असं होत नसतं असं संजय राऊत म्हणाले.
नाना पटोले यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात मविआ सरकार येणार असं म्हटलं. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, सरकार महाविकास आघाडीचं येणार. जर त्यांचा मुख्यमंत्री होणार असेल तर राहुल गांधी, खरगेजींनी, सोनिया गांधींनी ते घोषित केलं पाहिजे. तसंच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या बिटकॉईन प्रकरणात तथ्य नाही, ते बोगस प्रकरण आहे असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT