PM Narendra Modi : मोदींनी संभाजीनगरच्या सभेत 'मराठा' आरक्षणाचा उल्लेख करणं टाळलं? अर्थ काय?

मुंबई तक

14 Nov 2024 (अपडेटेड: 14 Nov 2024, 04:25 PM)

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपची संभाजीनगरच्या सभेत मोदी काय म्हणाले?

point

मविआवर निशाणा साधताना मोदींचे गंभीर आरोप

point

छत्रपती संभाजीनगर नाव करण्यासाठी शिंदेंचं कौतुक

PM Narendra Modi Sabha Sambhajinagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. मतदानाला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि निवडणुकीच्या प्रचाराचा जोरही वाढत जातोय. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला फटका बसलेल्या मराठवाड्यात आता पूर्ण ताकद लावण्याचा भाजपकडून प्रयत्न होतोय. वर्षभरापूर्वी मराठवाड्यात उभा राहिलेला मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणाचा लढा आणि त्यातून सरकारबद्दल तयार झालेली निराशा हे भाजपला फटका बसण्याचं एक मोठं कारण राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात होतं. भाजपच्या अनेक नेत्यांनी ते मान्यही केलं होतं. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आरक्षणावर बोलणार का यावर सर्वांचं लक्ष लागून होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेताना पंतप्रधान मोदींनी काही मुद्दे मांडले. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना त्यांची भूमिका कशी आरक्षणविरोधी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणाचा उल्लेख केला नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Ajit Pawar: "मुस्लिमांच्या भावना दुखावणार...", 'बटेंगे तो कटेंगे'वरून अजित पवार नेमकं काय म्हणाले?

 

छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलून आम्ही संभाजीनगरकरांची आणि बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली असं म्हणत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमचं कौतुक मोदींनी केलं. ज्यांना संभाजी महाराजांच्या नावाची अडचण आहे, ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्यामध्ये आपला मसिआ दिसतो. त्यांना तुम्ही स्वीकाराल का? असा सवाल मोदींनी केला आणि मविआवर निशाणा साधला. 

 

आरक्षणाच्या मुद्द्यावर काय म्हणाले मोदी? 

 

"आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची खरी भूमिका काय हे सांगणाऱ्या वर्तमानपत्रांच्या जुन्या जाहिराती सध्या व्हायरल होत आहे. काँग्रेसचे लोक आधी आरक्षणाला देशाच्या विरोधात असल्याचं म्हणायचे.. काँग्रेस आरक्षणाला मेरिटच्या विरोधात असल्याचं सांगत होते, काँग्रेसचा अजेंडा अजूनही असाच आहे. मागच्या दहा वर्षांपासून असलेला ओबीसी समाजाचा प्रधानमंत्री यांना सहन होत नाही. यामुळेच काँग्रेसचे शहजादे विदेशात जाऊन सांगतात की, आरक्षण संपवून टाकू. मविआ आता एससी, एसटी, ओबीसींना तोडण्यात व्यस्त आहे. माळी समाजाला गवंड्यांशी, लोहाराला सुताराशी, वाणी आणि तेली यांना आपसात लढवण्याचं काम काँग्रेस करतंय. त्यामुळे या समाजांची ताकद कमी होईल आणि काँग्रेसला फायदा होईल, म्हणूनच काँग्रस सत्तेसाठी हे प्रयत्न करतंय. एकदा सरकार आलं की, एससी, एसटी, ओबीसींचं आरक्षण ते काढून टाकतील. त्यामुळेच आपल्याला जागृत होऊन एक व्हावं लागेल. त्यामुळेच आपल्याला एक हैं तो सेफ हैं हे लक्षात ठेवावं लागेल" असं म्हणत मोदींनी पुन्हा घोषणाबाजी केली.मात्र मोदींकडून या भाषणात मराठा आरक्षणाचा उल्लेख टाळलेला दिसतोय.

एकूणच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी, एससी, एसटीच्या आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसवर अनेक आरोप केले. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून मराठवाड्यातील मराठा समाजासाठी ज्वलंत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा मोदींनी आपल्या भाषणात घेतलेला दिसला नाही. मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचं केंद्र हे पंतप्रधान मोदी यांच्या सभास्थळापासून 70 किमी अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगरही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्र म्हणूनच पाहिलं गेलं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीगरमध्ये येऊन या मुद्द्याचा उल्लेख न केल्या मराठा समाज काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

    follow whatsapp