Raj Thackeray : राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याकडे देशाचं लक्ष लागून होतं. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा आणि अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हा सोहळा पार पडताच, राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 2019 लाच देवेंद्र फडणवीसांना ही संधी मिळायला हवी होती, पण तेव्हा त्यांना ती संधी मिळाली नाही अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली. तसंच जर सरकार चुकलं तर ती चूक दाखवण्याचं काम आम्ही करत राहू असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
ADVERTISEMENT
राज ठाकरे काय म्हणाले?
हे ही वाचा >>Maharashtra CM Oath Ceremony LIVE updates : अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री तर शिंदेंनी पहिल्यांदा घेतली शपथ
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.
२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.
पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.
पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की...
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !
राज ठाकरे.
हे ही वाचा >> Maharashtra New CM: 'मी देवेंद्र सरिता गंगाधरराव...', महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी घेतली शपथ!
राज ठाकरे यांनी या शुभेच्छा देताना एका अर्थाने आपली पुढच्या पाच वर्षांसाठीची भूमिकाच जाहीर केल्याचं दिसतंय. यापूर्वी अनेकदा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या भेटीगाठींमुळे त्यांच्यात राजकारणाच्या पलीकडे मैत्री असल्याचं दिसलं होतं. त्यामुळे आता येणाऱ्या काळात मनसेला आंदोलन करावं लागणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ज्या शपथविधी सोहळ्यावर सर्वांचं लक्ष होतं. तो शपथविधी अखेर आज पार पडला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या
ADVERTISEMENT
