Supriya Sule and Nana Patole Audio Fact Check : तो आवाज खरंच सुप्रिया सुळे, पटोलेंचा? फॅक्टचेकचा धक्कादायक रिपोर्ट

सुधीर काकडे

20 Nov 2024 (अपडेटेड: 20 Nov 2024, 05:22 PM)

ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. मात्र, आता या ऑडिओ क्लिप बनावट असल्याचं समोर आलं आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजपने शेअर केलेल्या ऑडिओ क्लिप खऱ्या?

point

फॅक्टचेकमध्ये काय समोर आलं?

point

निवडणुकीत क्रिप्टोकरन्सीमधील पैशांचा वापराचा दावा खरा?

Supriya Sule and Nana Patole Audio Clip Fact check : राज्यात काल एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे भाजपने काही ऑडिओ क्लिप शेअर करत खळबळ उडवून दिली. भाजपने तीन ऑडिओ क्लिप पोस्ट करत त्यामध्ये सुप्रिया सुळे, IPS अधिकारी अमिताभ गुप्ता आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांचा ऑडिट फर्मचा कर्मचारी गौरव मेहतासोबतचा संवाद असल्याचा दावा केला होता. राज्यात आज 20 नोव्हेंबररोजी एकाच टप्प्यात सर्व जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडतंय, मात्र ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. मात्र, आता या ऑडिओ क्लिप बनावट असल्याचं समोर आलं आहे. BOOM या संस्थेने या बद्दलचा फॅक्टचेक केला असून, न्यूज मिनिटने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे वाचलं का?

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आज होणाऱ्या मतदानासाठी गेल्या काही दिवसांपासून सगळेच पक्ष तुफान प्रचार करताना दिसले. एकीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांची महायुती तर दुसरीकडे काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी लढत सध्या राज्यात आहे. 18 नोव्हेंबरला प्रचार संपला. त्यानंतर काल 19 नोव्हेंबरच्या रात्री भाजपने काही ऑडिओ क्लिप शेअर केल्या. ज्यामध्ये सुप्रिया सुळे, नानो पटोले यांचं संभाषण असल्याचं म्हटलं होतं. तर संभाषणात सहभागी असलेल्या इतर दोन व्यक्ती म्हणजे ITBP चे पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता आणि सारथी असोसिएट्स या ऑडिट फर्मचे कर्मचारी गौरव मेहता हे असल्याचा भाजपचा दावा आहे.
 

पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी याबद्दल गंभीर आरोप केले होते. "नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांनी 2018 च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणातील बिटकॉइन्सचा गैरवापर केला आणि सध्याच्या निवडणुकांमध्ये त्या पैशांचा वापर केला" असा आरोप पाटील यांनी केला. पाटील यांनी आरोप करताना आणखी काही नावं घेतली होती. आयपीएस अमिताभ गुप्ता, गौरव मेहता आणि भाग्यश्री नवटके ही तीन नावं त्यांनी घेतली आहेत. भाग्यश्री नवटके यादेखील आयपीस अधिकारी असून, त्या सध्या चंद्रपूरमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर ज्या अमिताभ गुप्तांवर आरोप करण्यात आले आहेत, ते सुद्धा आधी पुण्यात कार्यरत होते.  एएनआयने दिलेल्या माहितीनुसार पाटील यांनीच या कथित ऑडिओ क्लिप समोर आणल्या आहेत.

 

हे ही वाचा >>Maharashtra Election 2024 Live: उत्तर महाराष्ट्रात मतदानाचा टक्का किती? वाचा सविस्तर माहिती

 


भाजपने या कथित ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते. "बिटकॉइन्सच्या गैरव्यवहाराचा हा पुरावा" असल्याचा दावा करत चार कथित व्हॉईस नोट्स भाजपने शेअर केल्या. या रेकॉर्डिंगमध्ये सुप्रिया सुळे आणि पटोले यांच्या आवाजात चार क्रिप्टो वॉलेटमध्ये साठवलेल्या बिटकॉइन्सच्या बदल्यात रोख रक्कम मागतानाचा संवाद होता. तसंच या प्रकरणाची कोणतीही चौकशी होणार नाही असा शब्द सुप्रिया सुळे देत असल्याचंही ऐकू येतंय. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन गंभीर आरोप केले होते.


फॅक्ट चेक कसा केला? काय आढळलं? 

BOOM या फॅक्ट चेक करणाऱ्या संस्थेने जेव्हा या कथित ऑडिओ क्लिप्सचा संवाद तपासला तेव्हा बनावट असून, जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञान वापरून तयार केल्या असल्याचं समोर आलं. पत्रकार आणि संशोधकांना फॅक्टचेक करण्यासाठी उपलब्ध असलेल्या "TrueMedia.org  या डीपफेक डीटेक्शन" टूलचा वापर करुन हा फॅक्ट चेक करण्यात आला आहे. चार ऑडिओ क्लिपपैकी तीन AI च्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. मात्र एक ऑडिओ क्लिप AI च्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे  की नाही हे तपासणं शक्य झालं नाही, कारण ती फक्त पाच सेकंदांची आहे.

भाजपने शेअर केलेल्या व्हाईस नोट्स ऐकून, त्यानंतर अमिताभ गुप्ता,  सुप्रिया सुळे, नाना पटोलेंच्या युट्यूबवर उपलब्ध असलेल्या मुलाखती ऐकून त्या आवाजाशी तुलना करुन पाहण्यात आली. मात्र तिघांचाही आवाज खऱ्या आवाजाशी मॅच झाला नाही.

व्हॉइस नोट 1

ऑडिट फर्मचे कर्मचारी गौरव मेहता आयपीएस अमिताभ गुप्ता यांच्याशी बोलत आहेत. या कथित व्हॉईस नोटमध्ये, सारथी असोसिएट्स या ऑडिट फर्मचा कर्मचारी गौरव मेहता आणि आएयपीएस अमिताभ गुप्ता हे संवाद साधताना दिसतायत. त्यासाठीही 'TrueMedia च्या AI डीपफेक डिटेक्शन टूल'चा वापर करून ऑडिओ क्लिपची चाचणी केली. ज्यामध्ये ही क्लिप बनावट असल्याचं आढळून आलं. 

 

व्हॉइस नोट 2
 

दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळे गौरव मेहता यांच्याशी बोलताना दिसतायत. या कथित व्हॉईस नोटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतायत की, "बिटकॉइन्सच्या बदल्यात रोख रक्कम पाठवा, तपासाची चिंता करु नका, सध्या निवडणुका सुरु आहेत, आमचं सरकार आल्यावर आम्ही बघून घेऊ." सत्य पडताळणी करण्यासाठी या व्हॉईस नोटमधील आवाजाची तुलना सुप्रिया सुळे यांच्या समदीश भाटिया यांनी घेतलेल्या एका मुलाखतीमधील आवाजासोबत मॅच करुन पाहण्यात आला. मात्र हे दोन्ही आवाज एकमेकांपेक्षा एकदम वेगळे असल्याचं आढळलं. त्यामुळे ही क्लिपही AI द्वारे बनवल्याचं स्पष्ट झालं. 
 


व्हॉइस नोट 3

काँग्रेस नेते नाना पटोले आयपीएस अमिताभ गुप्ता यांच्याशी बोलताना ऐकू येतायत. या कथित व्हॉईस नोटमध्ये पटोले यांनी आयपीएस अमिताभ गुप्ता यांना बिटकॉइनच्या पैशांबद्दल तुम्हाला काल सांगितलं होतं नाही, अशी मस्करी करु नका म्हणत दम देताना दिसत आहेत. TrueMedia.org च्या टूलने ही ऑडिओ क्लिप चेक करता आली नाही, कारण ही रेकॉर्डिंग फक्त 5 सेकंदांची आहे. मात्र त्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंगमधील पटोले यांच्या आवाजाची तुलना 19 नोव्हेंबर 2024 रोजी प्रकाशित झालेल्या Jistnews या YouTube चॅनेलवरील त्यांच्या मुलाखतीशी करुन पाहण्यात आली. तेव्हा नाना पटोलेंचा मूळ आवाज ऑडिओ कथित ऑडिओ क्लिपमधील आवाजाशी जुळला नाही. 


व्हॉइस नोट 4

चौथ्या ऑडिओ क्लिपमध्ये IPS अमिताभ गुप्ता आणि गौरव मेहता यांच्यातला संवाद असल्याचा दावा करण्यात आलाय. नाना पटोले आणि सुळे यांनी मागणी केल्यानुसार बिटकॉइन्ससाठी रोख रकमेबद्दल बोलतानाची ही ऑडिओ क्लिप आहे. यूट्यूबवर आयपीएस गुप्ता यांच्या अनेक मुलाखती आहेत. त्यापैकी एकाही मुलाखतीमधील त्यांच्या आवाजाशी या ऑडिओ क्लिपमधील आवाज जुळला नाही. TrueMedia च्या टूलच्या माध्यमातूनही ही ऑडिओ क्लिप AI द्वारे निर्माण केली असल्याचं म्हटलं आहे. 

    follow whatsapp