Mumbai Politics Latest News : मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-शिवसेना युतीने कंबर कसल्याचं दिसत आहे. महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जात असतानाच आता शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 1 जुलै रोजी आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बीएमसीवर मोर्चा काढला जाणार आहे. याच मोर्चाच्या आधी शिवसेनेने (युबीटी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केला आहे. (Uddhav Thackeray Shiv Sena attacks on Eknath Shinde and devendra Fadnavis)
ADVERTISEMENT
शिवसेनेने (युबीटी) सामना अग्रलेखातून मुंबई महापालिकेवर प्रशासक आल्यापासून घेतल्या गेलेल्या निर्णयांवर बोट ठेवलं आहे. शिवसेनेने म्हटलंय की, “पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई आणि मुंबईकरांची दैना उडाली आहे. भ्रष्टाचाराने मुंबई तुंबल्याचा हा परिणाम. महाराष्ट्राच्या राजधानीत गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे सरकार नाही, महापौर नाहीत, विषय समित्या नाहीत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने मुंबईचा जो कारभार सध्या चालला आहे त्यास फक्त लुटमार असेच म्हणता येईल.”
शिंदेंसाठी मुंबई म्हणजे एटीएम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करताना सामना अग्रलेखात असंही म्हटलंय की, “मुंबई पालिकेत जी लुटमार सुरू आहे ती फडणवीस-मिंधे यांच्या आशीर्वादाने. मुंबई म्हणजे मुंबादेवी ही महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेची माऊली, पण मिंध्यांसाठी मुंबई म्हणजे ‘एटीएम’ किंवा सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. भाजप अंडी खात आहे व मुख्यमंत्री मिंधे यांनी सरळ कोंबडी कापून खाण्याचे ठरवले आहे, ते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर.”
हेही वाचा >> ‘पवारांच्या तोंडून सत्य.. गुगलीमुळे माझ्याऐवजी त्यांचे पुतणेच..’, फडणवीसांचा पलटवार
शिवसेनेसह (युबीटी) विरोधकांकडून सातत्याने शिंदेंच्या शिवसेनेला खोके म्हणून डिवचलं जात आहे. अग्रलेखात याचा उल्लेख करत पुन्हा वर्मावर बोट ठेवलं आहे. “महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामात किमान सहा हजार कोटींचा जम्बो घोटाळा झाला आहे. ज्या पाच कंपन्यांना या कामाचे टेंडर मिळाले त्यांच्यामागचे खरे सूत्रधार हे ‘खोके’ सरकारचे मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय आहेत. पण तुमची ती ‘ईडी’ वगैरे यंत्रणा त्याबाबत डोळे मिटून बसली आहे”, असं शिवसेनेने (युबीटी) म्हटलं आहे.
भाजप व्यापारी, ठेकेदारांचा पक्ष
शिवसेनेने (युबीटी) मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या कारभाराबद्दल बोलताना म्हटलं आहे की, “भारतीय जनता पक्ष हा व्यापारी व ठेकेदारांचा पक्ष आहे. मुंबई शहर व मुंबई महानगरपालिकेशी त्यांचे भावनिक नाते नाही. त्यामुळे मुंबईचे हे असे ओरबाडणे त्यांना व्यथित करीत नाही. मुंबईची सुरक्षा, नागरी सुविधा याबाबत कोणताही ठोस कार्यक्रम भाजप किंवा त्यांच्या मिंधे गटाकडे नाही. त्यामुळे सहा हजार कोटींची रस्त्यांची कामे बेधडक देऊन घोटाळय़ाचा मार्ग तयार केला.”
हेही वाचा >> ‘..तर मी विकेट घेणारच ना’, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचे गौप्यस्फोट; फडणवीसांना टोले
“मुंबई पालिकेत लोकप्रतिनिधी नसताना रस्ते, नालेसफाईची कामे झाली, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबली व लोकांचे हाल झाले. आता शिवसेनेची सत्ता नाही. राज्य तर मिंध्यांचेच आहे. मग या तुंबण्याचे खापर कोणावर फोडणार? मुख्यमंत्री सांगतात, ‘पावसाचे स्वागत करा. मुंबईच्या तुंबण्याकडे दुर्लक्ष करा.’ हे विधान असंवेदनशील आहे”, असं आदित्य ठाकरेंपाठोपाठ सामना अग्रलेखातही म्हटलं आहे.
“मिंधे-भाजपची पिलावळ”, शिवसेनेचा (युबीटी) ‘वार’
शिवसेनेने (युबीटी) शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. “एकाच मर्जीतल्या कॉन्ट्रक्टरसाठी 160 कोटींची कामे ही 263 कोटींना दिली. हा मधला ‘गाळा’ ज्यांनी मारला ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच गोतावळ्यात आहेत. रस्ते, फर्निचर, आरोग्य अशा सर्वच विभागांत फक्त टेंडरबाजीला ऊत आला असून या सर्व घोटाळेबाजांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर खटले चालवायला हवेत, पण सध्या साप समजून भुई धोपटण्याचे प्रकार सुरू आहेत. मुंबई महापालिका, मुंबई शहर एका बाजूला सध्याचे दिल्लीश्वर लुटत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजप व त्यांची मिंधे पिलावळही लुटमार करीत आहे”, असं शिवसेनेने (युबीटी) म्हटलं आहे.
ADVERTISEMENT