धनुष्यबाण आणि शिवसेनेचं काय होणार? कोर्टाच्या निकालानंतर राज ठाकरेंचा सवाल

मुंबई तक

12 May 2023 (अपडेटेड: 12 May 2023, 08:18 AM)

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. या निकालावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं. राज ठाकरे यांनी धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना नावाचे काय होणार याबद्दल प्रश्न उपस्थित केला.

MNS Chief Raj Thackeray First Reaction on Maharashtra Political crisis and supreme court judgement

MNS Chief Raj Thackeray First Reaction on Maharashtra Political crisis and supreme court judgement

follow google news

शिवसेनेत झालेल्या भूकंपानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि नवा राजकीय संघर्ष उभा राहिला. महाराष्ट्रातील या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. निकालानंतर वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली. निकालातील विधिमंडळ गट आणि राजकीय पक्ष या मुद्द्यावर बोट ठेवत राज यांनी धनुष्यबाण चिन्हं आणि शिवसेना नावाचं काय होणार? असा सवाल उपस्थित केला. (MNS Chief Raj Thackeray First Reaction on Maharashtra Political crisis and supreme court judgement)

हे वाचलं का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “खरंतर आलेला निर्णय बराच गोंधळ निर्माण करणारा आहे. मागे माझ्या केसेस चालू होत्या आणि कोर्टाकडून मला नोटीसा येतात, त्याची ती भाषा असते ना, ती भाषा वाचल्यावर आपल्या लक्षात येत नाही की, आपल्याला सोडलंय की, अटक केलीये. इतकी ती किचकट भाषा असते.”

राज ठाकरेंनी निकालातील कोणत्या मुद्द्यावर ठेवलं बोट?

कोर्टाच्या निकालाबद्दल बोलताना राज म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की, सगळी प्रक्रिया चुकली परंतू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्याच्यामध्ये मी जे वाचलं की, त्यांनी सांगितलं की विधिमंडळातील गट पक्ष म्हणून समजला जाणार नाही. बाहेरचा जो आहे, तोच पक्ष समजला जाईल. आता ही गोष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे. चिन्ह आणि नाव आता त्याचं काय होणार?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा >> शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर…; अजित पवार सुषमा अंधारेंवर भडकले

“कसं आहे, या सगळ्यामध्ये निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे. सुप्रीम कोर्ट एक यंत्रणा आहे. सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या गोष्टींमुळे आता निवडणूक आयोग काय करणार? म्हणून म्हटलं की त्या सगळ्या गोष्टी भयंकर गोंधळाच्या आहेत. मला असं वाटतं की ही सगळी धूळ खाली बसेल, तेव्हा आपल्या सगळ्यांना कळेल की, नक्की काय झालं”, असंही ते म्हणाले.

नैतिकतेच्या आधारावर राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या विधानावर राज म्हणाले…

सुप्रीम कोर्टाने निकाल देताना असं नमूद केलं की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला असल्याने आम्ही त्यांना परत त्या पदावर आणू शकत नाही. तर आपण नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भूमिका मांडताना सांगितलं की, “त्यांचे काय प्रश्न आहे, त्यात माझा काही प्रश्न नाही. तुम्ही कोर्टाचं विचारलं म्हणून तेवढं सांगितलं.”

हेही वाचा >> Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा नेमका अर्थ काय?

“प्रश्न असा आहे की, कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून नाही राहिले म्हणून आज हे सगळं उभं राहिलं. त्यामुळे जपून राहिलं पाहिजे. आपण कुठल्या पदावर बसलेलो आहोत, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे”, अशी असं भाष्य राज ठाकरेंनी संपूर्ण प्रकरणावर केलं.

शिवसेना वाद : सध्या स्थिती काय आहे?

बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर दावा ठोकला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव दिलं. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल ही निवडणूक निशाणी दिलेली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला आता ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. या प्रकरणावरील सुनावणी सुरु असून, मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला म्हणणं सादर करण्यास सांगितलेलं आहे.

    follow whatsapp