महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे आणखी 10 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील डेल्टा प्लस रूग्णांची संख्या ही 76 झाली आहे. महाराष्ट्रात आढळलेल्या डेल्टा प्लस रूग्णांमध्ये कोल्हापूर 6, रत्नागिरी 3, सिंधुदुर्ग 1, या रूग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या 76 पैकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने बाधित असलेल्या पाच रूग्णांचा आत्तापर्यंत राज्यात मृत्यू झाला आहे. त्यातले दोन रूग्ण रत्नागिरीत, मुंबई, बीड आणि रायगड या ठिकाणी प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लसच्या मृत्यू पाचही रूग्ण 65 वर्षांवरचे होते आणि त्यांना जोखमीचे आजारही झाले होते. पाचजणांपैकी दोघांनी कोव्हिशिल्ड या लसीचे दोन डोस घेतले होते तर दोघांनी कोणतीही लस घेतली नव्हती. आणखी एका रूग्णाच्या लसीकरणाबाबत माहिती मिळाली नाही असं आरोग्य विभागाने सांगितलं.
आतापर्यंत राज्यात ५ रुग्णांचा डेल्टा प्लस व्हेरिएंटने मृत्यू झाला असला तरीही लोकांनी यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. डेल्टा प्लस विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता कोरोनाचे सर्व नियम, मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं याचं पालन करावं अशी विनंती टोपे यांनी केली आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमका काय आहे?
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये आणखी बदल होऊन म्हणजेच म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा व्हेरिएंट तयार झाला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये डेल्टा व्हेरिएंटमधे असलेले सगळे म्युटेशन आहेत. तसंच या व्हेरिएंटमध्ये K417N हे म्युटेशनही आढळलं आहे. भारतात सगळ्यात आधी आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटचं शास्त्रीय नाव B.1.617.2 असं आहे. तर आता म्युटेट झालेल्या म्हणजेच बदल झालेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचं नाव हे B.1.617.2.1 असं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिलेली माहिती अशी ‘कोरोना संसर्गाची दसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन झालं आहे. याला डेल्टा प्लस असं नाव देण्यात आलं आहे.’
ADVERTISEMENT