Omicron Variant: अखेर भारतातही झाली ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री, ‘या’ राज्यात सापडले 2 पॉझिटिव्ह

मुंबई तक

• 11:50 AM • 02 Dec 2021

नवी दिल्ली: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) देशात येऊ नये यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न सुरु होते. मात्र, आता हे सगळे प्रयत्न विफल ठरल्याचं दिसत आहे. कारण ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दोन कोरोनाबाधित रुग्ण आता भारतात सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमधील असल्याचं समजतं आहे. खुद्द भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आरोग्य […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) देशात येऊ नये यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न सुरु होते. मात्र, आता हे सगळे प्रयत्न विफल ठरल्याचं दिसत आहे. कारण ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दोन कोरोनाबाधित रुग्ण आता भारतात सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमधील असल्याचं समजतं आहे.

हे वाचलं का?

खुद्द भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या हवाल्याने म्हटले आहे की, कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 5 पट जास्त धोकादायक आहे आणि इतर व्हेरिएंटपेक्षा तो अधिक वेगाने लोकांना संक्रमित करु शकतो.

आतापर्यंत 29 देशांमध्‍ये ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित रूग्णांची ओळख पटली आहे. डब्ल्यूएचओने या नव्या व्हेरिएंटला Variant of Concern या श्रेणीत ठेवलं आहे. सगळ्यात आधी दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरिएंट आढळून आल्याचं समोर आलं होतं.

देशातील प्रसिद्ध डॉक्टर आणि मेदांता हॉस्पिटलचे संस्थापक डॉ नरेश त्रेहान यांनी या व्हेरिएंटबद्दल सांगताना असं म्हटलं आहे की, कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित एक व्यक्ती तब्बल 18 ते 20 लोकांना संक्रमित करू शकतो.

दुसरीकडे, देशातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली आहे की, गेल्या महिनाभरापासून देशात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत आहेत.

ते म्हणाले, ‘आता फक्त दोन राज्ये महाराष्ट्र आणि केरळमध्ये 10 हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, जी देशातील एकूण संक्रमित रुग्णांच्या तुलनेत 55 टक्के आहेत.’

लव अग्रवाल म्हणाले की, ‘कोरोना लसीचे दोन्ही डोस दिल्यानंतर देशातील सुमारे 49 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.’

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे लोकांना संसर्ग झाल्याची बातमी समोर आल्यानंतर केंद्र सरकारने 15 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा निर्णय पुढे ढकलला आहे.

देशात ओमिक्रॉन संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन अलर्ट जारी केला होता आणि सर्व राज्यांना बाहेरून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.

Omicron Variant : आफ्रिकेसह इतर देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

यानंतर महाराष्ट्र, झारखंडसह अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे परदेशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती.

मात्र, असं असताना आता ओमिक्रॉनचे दोन रुग्ण भारतात सापडल्याने सरकारची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना हा भारतात आटोक्यात आल्याचं चित्र होतं. त्यामुळे सरकारने अनेक निर्बंध उठविण्यास सुरुवात केली होती. पण आता पुन्हा एकदा ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सर्वांचाच मनात धडकी भरली आहे.

    follow whatsapp