लग्न आहे पण फक्त मुलीचं. या लग्नात नवरदेव असणारच नाही, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, असंच एक लग्न होतंय, तेही आपल्या शेजारच्या राज्यात गुजरातमध्ये. क्षमा बिंदू ही २४ वर्षीय तरुणी स्वतःसोबतच लग्न करतेय.
ADVERTISEMENT
२४ वर्षीय क्षमा बिंदू सध्या तिच्या लग्नाची तयारी करतेय. ११ जून रोजी क्षमाचं लग्न होणार असून, कपड्यांपासून ते ज्वेलरीपर्यंत सर्वच गोष्टी क्षमाने बुक केल्या आहेत. क्षमा लवकरच लग्न करणार आहे, पण, तिच्या लग्नात नवरदेवच नसणार आहे. हीच बाब ऐकणाऱ्यांना बुचकळ्यात टाकत आहे.
नवरदेवच नाही, तर लग्न कसं होऊ शकतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नवरदेव नसण्याचं कारण म्हणजेच क्षमा बिंदू स्वतःशीच लग्न करणार आहे. क्षमा अगदी रितीरिवाजाप्रमाणे लग्न करणार आहे. ती लग्नात सात फेरेही घेणार आहे.
क्षमा बिंदूला स्वतःशीच का करायचं लग्न?
मुलगा असो वा मुलगी… लग्न करायचं म्हटलं की जोडीदार आलाच. पण क्षमा बिंदू या तरुणीने जोडीदार म्हणून स्वतःचीच निवड केलीये. याबद्दल तिने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
“मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण नवरी होण्याची इच्छा होती. त्यामुळेच मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला,” असं क्षमा म्हणाली.
भारतात यापूर्वी एखाद्या महिलेनं स्वतःशीच लग्न केलंय का? याबद्दल तिने इंटरनेटवर शोधलं. तिला अशी एकही महिला सापडली नाही. क्षमा म्हणते, “देशात एकल लग्न करणारी कदाचित मी पहिलीच मुलगी ठरणार आहे.”
क्षमा एका खासगी कंपनीत नोकरी करते. स्वतःशी लग्न करण्याबद्दल क्षमा म्हणते, “स्वतःशी लग्न करणं म्हणजे स्वतःवर कोणत्याही शर्थींशिवाय प्रेम करण्यास कटिबद्ध होण्यासारखंच आहे. हे एक प्रकारे स्वतःला स्वीकारण्यासारखंच आहे. लोक अशा व्यक्तीसोबत लग्न करतात, ज्यांच्यावर ते प्रेम करत असतात. मी स्वतःवर प्रेम करते. त्यामुळे मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्षमा हनिमूनलाही जाणार…
या आगळ्या वेगळ्या लग्नाबद्दल क्षमा म्हणते, “स्वतःसोबत लग्न करणं लोकांना वेगळं वाटतं असेल. महिलांनाही स्वतःचे विचार असतात, हेच मी यातून लोकांना दाखवू इच्छिते. माझे आईवडिल खुल्या विचारांचे आहेत. त्यांनी लग्नासाठी संमती दिलीये.”
क्षमा बिंदूचं लग्न गोत्री येथील एका मंदिरासोबत होणार आहे. त्याचबरोबर क्षमा हनिमूनलाही जाणार आहे. क्षमा हनिमूनसाठी गोव्याला जाणार असून, तिथे ती दोन आठवडे राहणार आहे.
सोलोगॅमी म्हणजे काय?
सोलोगॅमी वा ऑटोगॅमी म्हणजे स्वतःशीच विवाहबद्ध होणं. सोलोगॅमीच्या पुरस्कर्त्यांच्या म्हणण्यानुसार स्वतःशी लग्न करणं म्हणजे स्वतःबद्दलचं महत्त्व अधोरेखित करणं. हे आपल्याला आनंदी जीवनाच्या दिशेनं घेऊन जातं. याला स्वःविवाह असंही म्हटलं जातं.
ADVERTISEMENT