झटपट श्रीमंत होण्याच्या मोहातून पाच जणांना गजाआड जावं लागलं. डोंबिवलीत ही घटना घडली असून, मानपाडा पोलिसांनी कारवाई केली. पाच जणांनी एक-दोन नव्हे तर तब्बल ७८ एसी चोरले होते. महत्त्वाचं म्हणजे चोरलेल्या एसी आरोपींनी रस्त्यावर फेरीवाले बनून विकल्याचं समोर आल्यानं पोलिसांनाही धक्का बसला.
ADVERTISEMENT
पैसे मिळवण्याच्या लालचेनं ७८ एसी चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली होती. फेरीवाला बनून आरोपींनी या एसी रस्त्यावर उभं राहून विकल्या. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पाच चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरलेल्या एसींपैकी २० एसी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून २० एसी ५ लाख ८८ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच १५ लाख रूपये किमतीच्या दोन ईर्टिगा कारसुद्धा जप्त केल्या आहेत. या कार आरोपींनी गुन्ह्यात वापल्याचं पोलिसांनी सांगितलं असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
कल्याण-शीळ रस्त्यावर दावडी परिसरात रिजेन्सी अनंतम् हे गृहसंकुल उभारण्याचं काम सुरु आहे. या गृह संकुलातील प्रत्येक फ्लॅटमध्ये तीन एअर कंडिशनर अर्थात एसी लावून देण्याचं काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात गृह संकुलाच्या प्रत्येक फ्लोअरवर एसी आणून ठेवल्या होत्या. मात्र, यातील ७८ एसी गायब झाल्याचं सुपरवायझरच्या २१ ऑगस्ट रोजी लक्षात आलं. त्यानंतर या प्रकरणाची तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.
एसी चोरीला कसे गेले?
२० ऑगस्ट रोजी विनोद महतो हा तरुण गृह संकुलाच्या वॉचमनला भेटला होता. त्यानेच ही चोरी केली असावी; कारण तो काही दिवसापूर्वी गृह संकुलात काम करीत होता. पण, नुकतंच त्यानं काम सोडलं होतं. त्याची ओळख असल्यानं त्याला कुणी हटकलं नाही, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास करण्यात आला.या प्रकरणात रहेमान खान आणि दीपक बनसोडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघे खासगी कॉल सेंटरमध्ये गाडी चालक आहेत.
दरम्यान, पोलिसांनी विनोद महतो, सलीम रशीद आणि आदिल कपूर या तिघांना ताब्यात घेतलं. या पाचही जणांनी मिळून जवळपास ७८ एसी चोरी केल्या असल्याचं तपासात उघड झालं. या चोरट्यांनी तशी कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २० एसी ५,८८,००० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींपैकी एक आरोपी बिहार व एक उत्तर प्रदेशचा मूळ रहिवासी आहे. तर इतर आरोपी मुंबईच्या मिरा रोड व कुर्ला येथील रहिवासी आहेत.
ADVERTISEMENT