जस्टीस डी. वाय चंद्रचूड होणार देशाचे 50वे सरन्यायाधीश; कोण आहेत न्या. चंद्रचूड?

मुंबई तक

• 06:36 AM • 11 Oct 2022

न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. सध्याचे सरन्यायाधीश यू.यू लळीत यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणजेच देशाचे पुढील CJI म्हणून न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. केंद्राला पत्र पाठवण्यापूर्वी सरन्यायाधीश यू.यू लळीत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची बैठक बोलावली होती. प्रथेप्रमाणे, देशाचे सध्याचे CJI त्यांच्या उत्तराधिकार्‍याची शिफारस करणारे औपचारिक पत्र […]

Mumbaitak
follow google news

न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. सध्याचे सरन्यायाधीश यू.यू लळीत यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणजेच देशाचे पुढील CJI म्हणून न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. केंद्राला पत्र पाठवण्यापूर्वी सरन्यायाधीश यू.यू लळीत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची बैठक बोलावली होती. प्रथेप्रमाणे, देशाचे सध्याचे CJI त्यांच्या उत्तराधिकार्‍याची शिफारस करणारे औपचारिक पत्र सरकारला पाठवतात.

हे वाचलं का?

लळीत यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरपर्यंत आहे

खरे तर केंद्र सरकारने CJI लळीत यांना पुढील CJI च्या नावाची शिफारस करण्यास सांगितले होते. यूयू लळीत यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरपर्यंत आहे. नियमानुसार, CJI सरकारला दुसऱ्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतो. सध्या न्यायमूर्ती यू. यू लळीत यांच्यानंतर न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे दुसरे ज्येष्ठ न्यायाधीश असतील.

सरन्यायाधीश एक महिन्याआधी उत्तराधिकारी सुचवतो

ही एक प्रकारची परंपरा आहे, ज्यानुसार केंद्राकडून औपचारिक विनंती मिळाल्यावर सरन्यायाधीश त्यांच्या निवृत्तीच्या सुमारे एक महिना आधी सीलबंद कव्हरमध्ये त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस करतात. दरम्यान, सरन्यायाधीश त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतात, त्यानंतर सरकार त्यांची नियुक्ती करते.सरन्यायाधीश यूयू ललित यांचा 74 दिवसांचा कार्यकाळ संपणार आहे. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. 9 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे दोन वर्षांसाठी देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान नियमानुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होतील.

कोण आहेत न्या. चंद्रचूड?

न्या. चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ते एका मराठी कुटुंबात जन्मले त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यानंतर ते नवी दिल्लीतही शिकत होते. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते LLB झाले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM ही पदवी मिळवली. तसंच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन गौरवले. न्यायशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडीही केली.

बॉम्बे हायकोर्टात वकिली करत असताना चंद्रचूड यांनी रिझर्व्ह बँक, ONGC, अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मार्च 2000 मध्ये बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ऑक्टोबर 2013 ते अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती झाले. मे 2016 ला ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.

    follow whatsapp