कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रशासनाकडून विविध स्तरावर खबरदारी घेतली जात असून, दक्षिण आफ्रिकेसह परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जात असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत मुंबई विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांपैकी 9 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतून जयपूरमध्ये परतलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर मुंबईसह राज्यातील विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांच्या कोविड चाचण्या केल्या जात आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत जोखमीच्या (हाय रिस्क) देशांतून आलेल्या 485 प्रवाशांची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पहिला रुग्ण 10 नोव्हेंबरला आढळून आला होता. 21 वर्षीय प्रवासी पुरूष असून, तो लंडनमधून आला होता. त्यानंतर 25 नोव्हेंबरला मॉरिशसमधून आलेला 47 वर्षीय पुरुष प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीला (वय 39) कोरोनाचं निदान झालं.
उर्वरित सहा प्रवाशांपैकी चार लंडनमधून आलेले असून, एक पोर्तुगाल आणि एक जर्मनीमधून आलेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांचा शोधही घेतला जात आहे.
जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघे कोरोना पॉझिटिव्ह
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा उद्रेक झालेल्या दक्षिण आफ्रिकेतून राजस्थानातील जयपूरमध्ये परतलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना झाल्याचं निदान झालं. कुटुंबातील 9 व्यक्ती 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. कुटुंबातील सदस्यांपैकी आईवडिल आणि त्यांच्या दोन मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 12 व्यक्तींपैकी 5 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
ADVERTISEMENT