महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचं स्थान असलेल्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी राज्य सरकारने यंदा नवीन नियमावलीची घोषणा केली. यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आलेली असून मानाच्या दहा पालखी सोहळ्यांसाठी राज्य शासनाने बस गाड्यांची सोय केली आहे. राज्य सरकारच्या या कठोर नियमांवर वारकरी संप्रदायाने नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलत असताना अजित पवारांनी कुंभमेळ्यात कोरोनाच्या वेळी जे झालं ते इथे होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
“वारीची परंपरा ही वर्षानुवर्षे सुरु आहे त्यामुळे ती टिकलीच पाहिजे पण सोबत आपल्याला कोरोनाच्या सावटाचा विचार करायचा आहे. विभागीय आयुक्तांच्या बैठकीत सर्व अधिकारी, वारकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निर्बंध शिथील केले आहेत. वाखरीला गेल्यावर पायी चालत जाण्याची मूभा दिली आहे. परंतू कुंभमेळ्यानंतर कोरोनाचा जसा प्रसार झाला तसं इकडे होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.”
वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आम्हाला आदर आहे परंतू राज्याच्या आरोग्य हिताकडे पाहणंही गरजेचं आहे. तिसऱ्या लाटेची भीती असल्यामुळे योग्य तो विचार करुनच हा निर्णय घेण्यात आला आहे. पण तरीही काही वारकऱ्यांच्या मनात शंका असतील किंवा त्यांना काही भावना मांडायच्या असतील तर विभागीय आयुक्तांना त्यांच्या चर्चा करण्यास सांगू अशी माहिती अजित पवारांनी दिली.
असा असेल यंदाचा पालखी सोहळा –
-
पालखी यंदाही बसमधूनच पंढरपूरला जाणार, ज्यासाठी शासन लवकरच अधिकृत आदेश जाहीर करेल
-
इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक
-
काला आणि रिंगण सोहळ्याला यंदा परवानगी नाही
-
रथोत्सवासाठी यंदा फक्त १५ वारकऱ्यांना परवानगी
-
प्रत्येक पालखीसोबत फक्त ४० वारकरी असतील
मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपुरात होईल. वाखरीजवळ वाहनं पोहचल्यानंतर पुढील दीड किलोमिटरचं अंतर प्रतिकात्मक स्वरुपात पायी गाठण्याची परवानगी पालख्यांना देण्यात आली आहे. पंढरपूरचं मंदीर यावेळी दर्शनासाठी खुलं करण्यात येणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
असा असेल दहा मानाच्या पालख्यांना क्रम –
१) संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर)
२) संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
३) संत सोपान काका महाराज (सासवड)
४) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
५) संत तुकाराम महाराज (देहू)
६) संत नामदेव महाराज (पंढरपूर)
७) संत एकनाथ महाराज (पैठण)
८) रुक्मिणी माता (कौडानेपूर-अमरावती)
९) संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)
१०) संत चांगटेश्वर (सासवड)
ADVERTISEMENT