पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहेत. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माझ्या पतीला कोणतीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. हा सगळा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरू होता. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा तपास सुरू होता. त्यामुळे आता जी माहिती समोर आली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं एसीबीने सांगितलं आहे. किशोर वाघ यांच्याकडे असलेल्या ९० टक्के मालमत्तेचा हिशोब नाही असंही एसीबीने म्हटलं आहे.
काय आहे सचिन सावंत यांचं ट्विट?
किशोर वाघांवर आज नाही तर १५ दिवस आधी म्हणजेच १२ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. खुली चौकशी २०१६ ला भाजपने सुरू केली. चित्राताईंनी भाजपमध्ये प्रवेश केला नसता तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता. भाजप सरकारच्या राजकीय दिरंगाईमुळे आणि कोरोनामुळे वेळ लागला. बेहिशोबी मालमत्ता दिसली आहे असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.
१ डिसेंबर २००६ ते जुलै २०१६ दरम्यान वाघ यांच्याकडे असलेल्या उत्पन्नाचा तपास करण्यात आला होता. या तपासात त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती. त्यांच्या उत्पन्नापेक्षा ९० टक्के अधिक रक्कम होती. त्यानंतर एसीबीने १२ फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी किशोर वाघ यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तसंच जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत. मी बोलायला लागले तर एक एक माणसाला मी पुरून उरेन हे लक्षात ठेवा असा इशाराही वाघ यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT