विक्रांत चव्हाण, ठाणे
ADVERTISEMENT
भाजपचे (BJP) नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हे पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात आले आहेत. यावेळी जन आशिर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. याच दरम्यान, पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवी मुंबई विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) नामकरावरुन शिवसेनेला (Shiv Sena) डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
कपिल पाटील यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेत नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाविषयी महत्त्वाची बाब देखील सांगितली आहे. ज्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप वाद रंगण्याची शक्यता आहे.
‘मी मंत्री झाल्या-झाल्या नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील (D. B Patil) यांचे नाव द्यावे याकरता तात्काळ केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांची विमानतळ संघर्ष समिती सोबत भेट घडवून दिली.’ अशी माहिती कपिल पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. याचाच अर्थ आपला दि. बा. पाटील यांच्या नावाला समर्थन असल्याचं त्यांनी एका अर्थी स्पष्ट केलं आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मान्य करण्यात आला आहे. मात्र, नवी मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील अनेकांनी या विमानतळाला दि. बा. पाटील नाव दिलं जावं अशी मागणी केली आहे. यासाठी अनेकदा आंदोलनं देखील केली गेली आहेत.
दुसरीकडे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर ठाम आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी संघर्ष समितीशी याबाबत चर्चा देखील केली होती. नवी मुंबईतील दुसऱ्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात येईल. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र, तरीही संर्घष समितीचं समाधान झालेलं नाही. त्यामुळे विमानतळाच्या नावाबाबतचा वाद अद्यापही कायम आहे.
असं असताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संघर्ष समितीची भेट ही नागरी उड्डाण मंत्र्यांशी घालून दिली. त्यामुळे या मुद्द्यावरुन भाजपने एक प्रकारे शिवसेनेला डिवचण्याचाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘दिल्लीत मोदी विरोधक नाही तर सर्व भ्रष्टाचारी एकत्र येत आहेत’
दुसरीकडे कपिल पाटील यांनी एक वादग्रस्त विधान देखील केली आहे. ‘पूर्वी राजा विरोधात चोर, दरोडेखोर एकत्र यायचे. याचा अर्थ राजा चांगले काम करतो असं सिद्ध व्हायचं. आता दिल्लीत सर्व भाजप विरोधी नेते एकत्र येत आहेत याचा अर्थ नरेंद्र मोंदीजींचे काम चांगले सुरु असून लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. हे एकत्र येणारे सर्वजण भ्रष्टाचारी आहेत.’ असा थेट हल्ला कपिल पाटील यांनी केला आहे.
कपिल पाटील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता विरोधक देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Who is Kapil Patil: गोपीनाथ मुंडेंनी शेवटच्या क्षणी भाजपमध्ये आणलेले कपिल पाटील नेमके आहेत तरी कोण?
जन आशिर्वाद यात्रेदरम्यान ठाण्यातील तलावपाळी येथील अश्वारुढ छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्यास पुष्पाहार अपर्ण करण्यास कपिल पाटील आले होते.
ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर टोलनाका येथून कपिल पाटील यांच्या जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात झाली. ते वागळे इस्टेट, इंदिरा नगर, मासुंदा तलाव करत पुढे टेंभी नाका येथून पुढे जाऊन माजीवडा येथे ठाण्यातील जन आशिवार्द यात्रा संपन्न झाली.
ADVERTISEMENT