नागपूर : एरव्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसून येतात. मात्र सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार सत्ताधारी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT
नेमकं काय आहे प्रकरण?
बेळगावमध्ये आजपासून कर्नाटक विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीनं बेळगावमध्ये महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांसह, लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं होतं.
याच मेळाव्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी १९ डिसेंबर रोजी बेळगावात येण्याची परवानगी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती. परंतु आपल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं सांगत त्यांना बेळगावात बंदी करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं विधानसभेत?
याच मुद्द्यावरुन आज विधानसभेत सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरुन अजित पवार चांगलेच आक्रमक झाले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तरीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्यं केली जात आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राज्यात तणावाचं वातावरण आहे.
सीमावादाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे या प्रश्नावर योग्य तोडगा निघणं अपेक्षित होतं. मात्र तसं होताना दिसत नाही. गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर सुध्दा कर्नाटक सरकारची मुजोरी कायम आहे. कर्नाटकने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवली आहे. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारनं केलं आहे.
कर्नाटकची आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाची महाराष्ट्र आणि मराठी विरोधी भूमिका समोर येत असल्याने मराठी भाषकांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं आहे. या दडपशाहीच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. कर्नाटक सरकारची ही दडपशाही सहन केली जाणार नसल्याची भूमिकाही यावेळी अजित पवार यांनी मांडली.
ADVERTISEMENT