अहमदनगर: राज्यात राज्यसभा निवडणुकांचं वारं शांत झालेले असतानाच आता विधान परिषदेचे वारे वाहायला लागले आहे. येत्या २० तारखेला विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खळबळजनक विधान केले आहे.
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी सांगितले की, फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपचे सरकार आणावे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पवार कुटुंबासोबत वैयक्तिक संघर्ष नाही. आमच्या मतभिन्नता आहे. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत असे म्हणत विखे पाटलांनी अजित पवारांना भाजपमध्ये निमंत्रण दिले आहे. आता अजित पवार या निमंत्रणाला काय उत्तर देताता हे पाहावं लागणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे भाजपकडून खासदार आहेत.
विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी आणि मितभाषी आहेत. परंतु त्यांनी चुकीच्या सल्लागारांना बाजूला करावे. यापुढे मला विरोधी पक्षनेता नव्हे, तर मंत्री होणे आवडेल. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा आणि योग्यच होता. वडील सल्ला देण्यासाठी नसताना मी घेतलेला तो पहिलाच मोठा राजकीय निर्णय होता, असे विखे पाटलांनी अभिमानाने सांगितले.
ADVERTISEMENT