अकोला : अकोल्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांच्यावर रविवारी रात्री अज्ञात गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्यात कपले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.
ADVERTISEMENT
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्टसमोरील एका मेडिकलवर विशाल कपले संध्याकाळच्या दरम्यान बसले होते. त्यावेळी आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी तोंड बांधून कपलेंवर पाठीमागून पाठीत हल्ला केला. हल्ला होताच ते उठून उभा राहिले, त्याचवेळी दुसऱ्या हल्लेखोरांने त्यांच्या छातीत वार करून गंभीर जखमी केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने विशाल कपले यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कपले यांच्यावरील हल्ला जुन्या वादावरून झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले आहे. अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
शिवसेना कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला प्राथमिक दृष्ट्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा प्रकार असल्याचा दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून शिवसैनिकांमध्ये आणि विशाल कपलेंमध्ये वाद सुरु होते. त्यावरून हा हल्ला झाला असण्याची शक्यता आहे. दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांची हॉस्पिटलसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
ADVERTISEMENT