धनंजय साबळे, अमरावती: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील पांढरी शिवारात बुधवारी एका महिला आणि पुरुषाचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत काहीही समजू शकलेलं नव्हतं. मात्र, मृत महिलेच्या पतीने ही हत्याच असल्याचा दावा केला असल्याने हे हत्याकांड घडविणारा तिसरा कोण? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर चार टीम तयार केल्या आहेत. ज्यामध्ये सहा अधिकारी व 24 कर्मचारी अशा एकूण 30 जणांची नियुक्ती करण्यात आली. आता या चारही टीम स्वतंत्र तपास करणार आहेत.
प्रथमदर्शनी पोलिसांना ही आत्महत्या वाटत असली तरी बुधवारी रात्री मृत महिलेच्या पतीने परतवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आता त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे.
पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतात सुधीर रामदास बोबडे (वय 52 वर्ष) आणि 48 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून हे हत्याकांड घडलं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या हत्याकांडाचे गांभीर्य पाहता शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक टीमकडून झालेला तपास आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चार टीमचा नेमका तपास या सगळ्यानंतरच या प्रकरणातील गूढ पुढे येणार आहे.
पांढरी येथील घटनास्थळी पोलिसांच्या विविध टीमने गुरुवारी पुन्हा एकदा सर्चिंग केलं. काही पुरावा आढळून येतो का? याचा बारकाईने तपास करण्यात आला. प्राथमिक तपासात अजून ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. परंतु, मोबाइल कॉल रेकॉर्ड आणि इतर काही गोष्टींमुळे दोघांची हत्या झाली असण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
विवाहबाह्य संबंधामुळे जीव गमावला?
मृत महिला व सुधीरची पत्नी यांच्यात यापूर्वी दोघांच्या प्रेमसंबंधाच्या कारणावरुन हाणामारी देखील झाली होती. सुधीर आणि अलका या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे समजताच सुधीरच्या पत्नीने तिच्या घरासमोर येऊन जोरदार भांडण केलं होतं.
अशातच सुधीर व अलका हे एकमेकांना चाकूने मारून हत्या करु शकत नाहीत. असं सध्या तरी म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोघांवर कोणीतरी पाळत ठेवून त्यांची हत्या केली असावी असं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळेच पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुरुवारी सकाळी पांढरी येथील घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जिल्हा क्राईम बँच, परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा येथील अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली व आवश्यक सूचना दिल्या.
रक्ताच्या थारोळ्यात सापडला पुरुष आणि महिलेचा मृतदेह, शेवटच्या क्षणीही एकमेकांना मारली होती मिठी
बुधवारी शवविच्छेदनासाठी वेळ झाल्याने सुधीर बोबडे याच्या मृतदेहाचे गुरुवारी सकाळी तीन डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. त्यानंतर दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला होता.
सध्या या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्यात येत असून आवश्यक ते निर्देश दिले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. अचलपूरचे एसडीपीओ गौहर हसन हे तपास अधिकारी आहेत. जर देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार दोघांची हत्या करण्यात आली असेल तर ती हत्या घडविणारा तिसरा व्यक्ती कोण? याचा शोध लावण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.
ADVERTISEMENT