अमरावती : भाजपचे समर्थक आमदार रवी राणा विरुद्ध शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू हा वाद आता वरिष्ठांच्या कोर्टात पोहचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना भेटीसाठी मुंबईला बोलावून घेतलं. त्यामुळे या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याचवेळी कार्यकर्त्यांच्या भावना मात्र ‘आर या पार’च्या आहेत. एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा, असं कार्यकर्त्यांचं मत असल्याचा मोठा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला.
ADVERTISEMENT
बच्चू कडू म्हणाले, बैठकांबाबत मला माहित नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना ‘आर या पार’च्या आहेत. एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा, असं कार्यकर्त्यांचं मत आहे. कारण रवी राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलला आहे. आता त्यांनी जे काही आरोप केले, त्याबाबत व्यवस्थित अभिप्राय दिला आणि त्या सगळ्यांमुळे कार्यकर्त्यांचा समाधान झालं तर ठीकं आहे. अन्यथा एक तारखेचा विचार करू असा इशाराही त्यांनी दिला. तसंच जी बदनामी केली ती परत द्यावी, विषय संपला अशी मागणी असल्याचही आमदार कडू म्हणाले.
रवी राणा मुंबईला :
बडनेराचे आमदार रवी राणा आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नागपूर विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत रवी राणा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट होत आहे. त्याचबरोबर रवी राणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलविल्यामुळे मी आज मुंबई जात आहे”, असं रवी राण यांनी नागपूरहून मुंबईला रवाना होण्यापूर्वी सांगितलं होतं. शिंदे-फडणवीसांनी यात मध्यस्थी केल्यानं बच्चू कडू-रवी राणा वाद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बच्चू कडू-रवी राणा वाद : एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, प्रविण दरेकरांचे फोन… काय घडलं?
बच्चू कडू यांनी २८ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेत रवी राणांना पुरावे देण्याचं आव्हान दिलं होतं. इतकंच नाही, तर एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा वेगळा विचार करू, असा इशारा दिला होतं.
बच्चू कडू आक्रमक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात हालचाली झाल्या. बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे, पत्रकार परिषदेनंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि आमदार प्रविण दरेकर यांनी फोन केला. “हे प्रकरण वाढवू नका. त्याला (रवी राणा) शांततेत घ्या. मुख्यमंत्री म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांसोबत बोलतो”, असं या नेत्यांनी सांगितल्याचं बच्चू कडू म्हणाले होते.
बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणेच आता घडामोडी होताना दिसत आहे. बच्चू कडू यांच्याशी फोनवरून बोलल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना मुंबईला बोलावून घेतलं. त्याचबरोबर बच्चू कडू यांच्या बाजूनं शिंदे गटाकडून सुरूवातीला कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, बच्चू कडू आक्रमक झाल्यानंतर शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनीही रवी राणांना सुनावलं आणि फडणवीसांनाही यात मध्यस्थी करण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT