सोलापूर: भीमा नदीच्या पात्रात पोहण्यास गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. मृतांमध्ये 3 मुलींसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचं समजतं आहे. काळजाला चटका लावणारी ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथे घडली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी रामलिंग तानावडे (वय ४० वर्ष) याच्या मागोमाग त्याच्या दोनही मुली नजर चुकवून शनिवारी दुपारच्या सुमारास नदीत पोहण्यास गेल्या होत्या. त्याचवेळी शिवाजी तानवडेच्या बहिणीचा नऊ वर्षांचा मुलगा व 11 वर्षांची मुलगी हे दोघेही नदीच्या दिशेने आले. ही चारही मुलं अल्पवयीन होती आणि त्यातील कुणालाही फारसं पोहता येत नव्हतं. त्यातच पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने चौघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
भीमा नदीत बुडालेल्या मुलांची नावे खालील प्रमाणे:
1. समीक्षा शिवाजी तानवडे वय 13 वर्ष (इयत्ता आठवी)
2. अर्पिता शिवाजी तानवडे वय 12 वर्ष (इयत्ता सातवी)
3. आरती शिवानंद पारशेट्टी वय 12 वर्ष (इयत्ता सातवी)
4. विठ्ठल शिवानंद पारशेट्टी वय 10 वर्ष (इयत्ता पाचवी)
दुर्दैवी! पती-पत्नीच्या भांडणात दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
नेमकी घटना काय घडली?
शनिवार दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास शिवाजी रामलिंग तानवडे हा भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याच्या मागोमाग त्यांच्या दोन मुली समीक्षा व आर्पिता व त्यांच्या सोबत शिवाजीच्या बहिणाचा मुलगा विठ्ठल व मुलगी आरती असे चौघेही पोहण्यासाठी नदीजवळ गेले. यावेळी शिवाजी याने या चौघांनाही पाहिलं आणि घराकडे हाकलून दिले. त्यानंतर शिवाजी पोहण्यासाठी नदीमध्ये उतरला.
एकीकडे शिवाजी पोहण्यात गुंग असल्याचं पाहून चौघंही मुलं त्याच्या नकळत पाण्यात उतरले. शिवाजीची मोठी मुलगी समीक्षा हिला काही प्रमाणात पोहता येत होतं परंतु अर्पिता हिला फारसं पोहता येत नव्हतं. पण असं असतानाही चौघेही नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले. समीक्षा ही पोहत असताना अचानक आरती बुडू तिने समीक्षाला पकडलं तर दुसरीकडे अर्पिता हिला विठ्ठलनं पकडून धरलं.
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू
दरम्यान, याचवेळी नदीत पोहणाऱ्या शिवाजीला मुलांचा गडबड गोंधळ ऐकू आला आणि त्याने तात्काळ मुलांच्या दिशेने धाव घेतली. सुरुवातीला त्याने समीक्षा व आरती यांना थोडेसं बाजूला घेऊन किनाऱ्याजवळ सोडलं आणि नदीबाहेर जाण्यास सांगितलं. दुसरीकडे मुलगी अर्पिता ही विठ्ठलला सोबत घेऊन किनाऱ्याच्या दिशेने येत असल्याचं पाहिल्याने शिवाजी तात्काळ तिकडे वळला. त्यांना हाताशी धरायला गेलेल्या शिवाजीचं त्याच वेळी किनाऱ्याकडे असलेल्या समीक्षा आणि आरती यांच्याकडे लक्ष गेलं. त्यावेळी तेथील पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्या दोघीही बुडू लागल्याचं त्याला दिसलं. दुसरीकडे हाताशी आलेले अर्पिता आणि विठ्ठल हे देखील पाण्याच्या जोरदार प्रवाहाने त्याच्या हातून निसटून गेले.
आपल्या डोळ्यांदेखत चारही मुलं वाहून गेल्याचं पाहून शिवाजी देखील हतबल झाला आणि तो देखील पाण्यात बुडू लागला. त्याच वेळी त्याचे नातेवाईक अप्पू संगप्पा पारशेट्टी याने शिवाजी बुडत असल्याचे पाहून नदीत उडी घेऊन वेळीच बाहेर काढलं. पण चारही मुलं वाहून गेल्याने शिवाजी तानवडे याला जबर धक्का बसला आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT