मुंबईत सध्या प्रचंड चर्चा आहे ती अंधेरीतल्या पोटनिवडणुकीची. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. रमेश लटके यांच्या जागी शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. आजपासून ऋतुजा लटके यांनी प्रचाराचा नारळ फोडला. ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
ADVERTISEMENT
प्रचाराला सुरूवात करताना काय म्हणाल्या ऋतुजा लटके?
“प्रचाराला सुरूवात करतानाच ऋतुजा लटके म्हणाल्या की लोक मला बहुमताने निवडून देतील याचा विश्वास वाटतो. ३ तारखेला निवडणूक आहे. निकाल लागल्यानंतर सगळं काही स्पष्ट होईल” असं ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
आणखी काय म्हणाल्या ऋतुजा लटके?
“रमेश लटके ज्या प्रमाणे गणपती मंदिरांचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात करायचे तशच सुरूवात आम्ही केली आहे. माझ्या प्रचार सभेला सगळे आपले जुने शिवसैनिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. आजपासून प्रचार सुरू होतो आहे. काल अर्ज दाखल करतानाही मोठी गर्दी होती. रमेश लटके यांच्याबाबत लोकांचं असलेलं प्रेम आणि निष्ठा माझ्यासोबत कायम असल्याचं दिसून आलं आहे” असंही ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी २५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे दाखल केली आहेत. मात्र मुख्य लढत आहे ती भाजपचे मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यातच. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. त्यानंतर शिवसेनेत भूकंप होऊन दोन गट पडले. उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटकेंना या ठिकाणाहून उमेदवारी दिली आहे. ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
कुणी कुणी भरला आहे अर्ज?
मुरजी पटेल (भारतीय जनता पार्टी)(भारतीय जनता पार्टी), ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निखिलकुमार ठक्कर (अपक्ष), चंद्रकांत मोटे (अपक्ष), संदेश जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया), मनोज नायक (राईट टू रिकॉल), अर्जुन मुरडकर (अपक्ष), आकाश नायक (भारत जनाधार पार्टी), मल्लिकार्जुन पुजारी (महाराष्ट्र विकास आघाडी), चंदन चतुर्वेदी (उत्तर भारतीय विकास सेना), राजेश त्रिपाठी (उत्तर भारतीय विकास सेना), संदीप नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निकोलस अलोदा (अपक्ष), साकिब नफुर इमाम मलिक (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), श्रीमती फर्झाना सिराज सय्यद (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), अंकुशराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी/अपक्ष), बाळा विनायक (आपली अपनी पार्टी), वाहिद खान (अपक्ष) आणि निर्मल नागबतूला (अपक्ष), राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष). या २५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
ADVERTISEMENT