पुणे: ‘अण्णा हजारे हे आदरणीय व्यक्ती आहेत ते कुणाच्या हातातलं बाहुले नाहीत त्यांच्या मंदिर उघडा मागणीचाही विचार व्हावा.’ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. राज्यभरातील मंदिरं सुरु व्हावीत यासाठी भाजपकडून आज (30 ऑगस्ट) संपूर्ण महाराष्ट्रात भाजपकडून शंखनाद आंदोलनं करण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. ज्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले:
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष मतांसाठी देव, धर्म मानत नाहीत. त्यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंदिरे खुली करायला तयार नाहीत.’
‘उद्धव ठाकरेंनी आजच्या आज नियमावली देऊन मंदिरे उघडावीत. केंद्राने सणासुदीला गर्दी करू नका अस म्हटलं असलं तरी गर्दी न करता एका वेळी 10 भाविकांना सोडता येऊ शकतं.’
‘अण्णा हजारे हे आदरणीय व्यक्ती आहेत ते कुणाच्या हातातलं बाहुले नाहीत त्यांच्या मंदिर उघडा मागणीचाही विचार व्हावा. अण्णा हजारेंनी मंदिरे खुली करावी यासाठी नेतृत्व करावं भाजप सामील होईल.’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली. आहे.
अण्णा हजारेंनी सरकारवर नेमकी काय टीका केली होती?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली धार्मिक स्थळं ही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहेत. पण आता राज्यातील धार्मिक स्थळं सुरु करण्यात यावी अशी मागणी करता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. राज्यातली मंदिर उघडण्यासाठी सरकारला अडचण काय आहे असा सवाल अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकारांशी बोलताना विचारला होता.
“दारुची दुकानं, हॉटेल सर्वकाही उघडलेलं आहे. तिकडे होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का? सात्विक विचारांमधून माणसं घडतात अशा मंदिरांना बंद करुन सरकारने नेमकं काय मिळवलं? मंदिर उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. मंदिर बचाव कृती समितीने यासाठी मोठं आंदोलन उभारावं यात मी स्वतः सहभागी होईन”, अशी ग्वाही अण्णा हजारेंनी दिली.
मंदिरं उघडण्यासाठी सरकारला अडचण काय आहे? अण्णा हजारेंचा सरकारला सवाल
‘भरकटत चाललेल्या समाजाला मंदिरं तारु शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते मंदिरातून मिळालेल्या संस्कारांमुळे आहे. माझं वय ८४ आहे. अजूनही माझ्यावर कोणताच डाग नाही.. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ जाऊन मी तुळशीची माळ घालत वारकरी झालो. संतांचे विचार देणारी मंदिर का बंद झाली? सरकारला संताचे विचार समजले का? असे प्रश्न अण्णा हजारेंनी उपस्थित केले होते.
ADVERTISEMENT