दीपक सूर्यवंशी, प्रतिनिधी, कोल्हापूर
ADVERTISEMENT
कोल्हापुरातल्या प्रसिद्ध राजाभाऊ भेळच्या मालकावर तिघांकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फुकट खाण्याच्या कारणावरून कोल्हापुरातल्या खाऊ गल्लीत वादाची घटना ८ दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी पाचगाव परिसरातील तरुणांना व्यवसायिकांनी चोप दिला होता. आज पुन्हा आभिषेक सरदार, गणेश यलगट्टी, प्रथमेश गायकवाड या तरूणांनी खासबाग परिसरात शस्त्रांद्वारे दहशत निर्माण करत ‘राजाभाऊ भेळ’चे मालक रवींद्र शिंदे यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने ते यातून बचावले. मात्र या हल्लेखोरांना स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. यापैकी दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आल.
कोल्हापुर पाचगांव इथले काही तरूण ८ दिवसांपूर्वी खासबाग मैदान नजीकच्या खाऊ गल्लीत गेले होते. तिथं त्यांनी दोन ते तीन व्यवसायिकांच्या कडून खाद्यपदार्थ मागितले. त्यानंतर पैसे न देताच ते निघून जात होते. त्यावेळी त्या तिघांसोबत खाऊ गल्लीतील व्यावसायिकांचा वाद झाला. त्यातून एका तरुणाला व्यवसायिकांनी मारहाण केली होती. तसंच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र त्यावेळी जुना राजवाडा पोलिसांनी त्या तरुणाला समज देऊन सोडलं होतं.
त्यानंतर सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा काही तरुण हातात शस्त्र घेऊन खाऊ गल्लीत गेले होते. तिथं सगळे व्यवसाय बंद झाल्यान ते रात्री मद्यप्राशन करत तिथेच बसले होते. मंगळवारी पुन्हा हे तीन तरूण शस्त्र घेवून खासबाग नजीक असलेल्या महिला बँकेच्या गाळ्यातील राजाभाऊ यांच्या दुकानाजवळ गेले. त्यांनी थेट गल्ल्यात हात घालून पैसे घेतले तसच रवींद्र उर्फ बापू शिंदे यांच्यावर सशस्त्र हल्ला केला.
दरम्यान राजाभाऊ भेळचे मालक रविंद्र उर्फ बापू शिंदे हे सावध असल्याने त्यांनी हा हल्ला परतवून लावला. यादरम्यान खाऊ गल्लीतील व्यवसायिक त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. तर दोघांना पकडण्यात यश आलं.
त्यांच्यावरही हल्याचा प्रयत्न त्या दोघांनी केला. यादरम्यान व्यावसायिकांनी एकत्र येऊन त्या दोघा शस्त्रधाऱ्यांना बेदम चोप दिला. या शस्त्रधारी दादांना थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणलं. बेदम मारहाण केल्यान त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सीपीआरमध्ये नेण्यात आलं. संध्याकाळी बापू शिंदे यांची रितसर फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून आभिषेक सरदार, गणेश यलगट्टी या दोघांना अटक करण्यात आली. तर तिसरा संशयित प्रथमेश गायकवाड याचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT