आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणारे बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी वीणा, मुलगा सुनील आणि संजय तसंच स्नुषा आणि नातवंडं असा परिवार आहे. तांबे यांची प्रकृती गेल्या आठवड्यात खालावली त्यामुळे त्यांना उपचारांसाठी पुण्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
बालाजी तांबे यांनी दैनिक सकाळच्या फॅमिली डॉक्टर या पुरवणीच्या माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृती केली. त्यातून विविध विषयांवर अनेक लेखही लिहिले. नागरिकांमध्ये आयुर्वेदाबाबत जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसार बालाजी तांबे यांनी केला. विविध समाज आणि घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडलं.
बालाजी तांबे यांनी आयुर्वेदावर बरंच काम केलं. त्यांचं गर्भसंस्कार हे पुस्तकही मोठ्या प्रमाणात वाचलं गेलं आहे. आरोग्य विषयक घडामोडींवर त्यांनी पाच दशकांपेक्षा जास्त काळ काम केलं. देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती. गर्भसंस्कार या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं इंग्रजीसह सहा भाषांमध्ये भाषांतरही करण्यात आलं आहे.
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात व नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते.
ADVERTISEMENT